तीन पालख्यांचा अभूतपूर्व भेटीचा सोहळा संपन्न
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील बसणी आणि केळ्ये ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदेवतांचा पारंपरिक शिमगोत्सव रविवारी, १ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार, आई महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि आई नवलाई-पावणाई-वाघजाई या तीन प्रमुख पालख्यांचा एकत्रित भेटीचा सोहळा या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला.
रत्नागिरीतील शिमगोत्सवाचे खास वैशिष्ट्य असलेल्या या सोहळ्यासाठी सकाळपासूनच भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता. सायंकाळी ६ वाजल्यापासून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिसरातील शेकडो सुवासिनींनी देवीची खणानारळाने ओटी भरून आशीर्वाद घेतले. हा कार्यक्रम रात्री १०:३० वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होता.
ओटी भरण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘देव रवळनाथ-महालक्ष्मीच्या’ जयघोषात पालख्या नाचवण्याचा सोहळा सुरू झाला. खांदेकऱ्यांनी लयबद्ध पद्धतीने पालख्या नाचवत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा सोहळा पाहण्यासाठी केवळ बसणी आणि केळ्ये गावातीलच नव्हे, तर पंचक्रोशीतील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी ६ वाजता सुरू झालेला हा धार्मिक कार्यक्रम आज पहाटे २:३० वाजेपर्यंत सुरू होता. पालख्यांच्या भेटीचा क्षण अत्यंत भावूक आणि नयनरम्य होता. वर्षानुवर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि शिस्तीने जपल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
उत्सवाच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्थानिक मंडळ आणि तरुणांनी चोख व्यवस्था ठेवली होती.













