परब मराठा समाजाच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर
परब मराठा समाज, मुंबई या संस्थेच्या महिला विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जागतिक महिला दिन’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत परेल (पूर्व) येथील सेंट्रल रेल्वे वर्कशॉप समोरील परमार गुरुजी मार्गावरील महाजनवाडी भावसार सभागृहात पार पडणार आहे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी याप्रसंगी विविध आकर्षक स्पर्धा आणि हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम. याप्रसंगी पारंपारिक ‘हळदी-कुंकू’ समारंभासोबतच महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भरगच्च स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रश्नमंजुषा, नॉनव्हेज (फिश, चिकन, मटण) पाककृती लिहून आणण्याची ‘पाककला स्पर्धा’, विनोदी उखाणा स्पर्धा आणि जास्तीत जास्त ३ मिनिटांची ‘एकपात्री अभिनय स्पर्धा’ यांचा समावेश आहे. तसेच, या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या महिलेला उत्कृष्ट पेहरावासाठी विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्याला एक वेगळी रंगत आणण्यासाठी संयोजकांनी खास ‘पोशाख संकेत’ निश्चित केला आहे.
त्यानुसार कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व महिलांनी जांभळी किंवा केशरी रंगाची साडी परिधान करून यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील जास्तीत जास्त भगिनींनी या सोहळ्याला प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन परब मराठा समाजाचे सरचिटणीस श्री. जी. एस. परब (9820297743) आणि महिला संघटक श्रीमती प्रतिक्षा परब मोबाईल नं ( 98703 38418 ) यांनी केले आहे.