राजापूर नगर परिषदेने नो पार्किंगचे फलक लावले, अंमलबजावणीचे काय?

राजापुरात अशा प्रकारे नो पार्किंग फलकांखाली गाडया पार्क करून नियमांची पायमल्ली केली जात आहे.
न. प. व पोलीस प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचा नागरिक व वाहन चालकांना फटका

शहरातील वाहतुक कोंडीच्या प्रश्नाबाबत प्रशासनाची उदासिनता

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर शहरातील वाहतुक कोंडी व बेशिस्त पार्किंग हा नित्याचाच विषय झाला आहे. नगर परिषद व पोलीस प्रशासनात नसलेला समन्वय आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबतची उदासिनता याचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकांना बसत आहे. नगर परिषद प्रशासनाने आपल्या हद्दीत व रस्त्यांवर नो पार्किंग झोन निश्चित करून तसे फलक जागोजागी लावले आहेत. मात्र या फलकांजवळच गाडया पार्क केल्या जात असल्याने हे फलक नामधारी ठरले आहेत. नगर परिषद प्रशासनाने हे नो पार्किंगचे फलक लावले पण त्याच्या अंमलबजावणीचे काय? ती कोण करणार? असा सवाल आता जनतेतुन उपस्थित केला जात आहे.

राजापूर शहरातील वाहतुक कोंडी, बेशिस्त पार्किंग ही बाब नित्याचीच झाली आहे. राजापुरात कायदे मोडण्यासाठीच आहेत असाच अनेकांचा समज आहे. यात पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने कुणीही कशीही आणि कुठेही गाडी लावा, धुम स्टाईल गाडी चालवा, दुचाकीवरून तीन सीट घेऊन जा तुंम्हाला कुणीही विचारणार नाही. अधिकृत रिक्षा स्टँड असतानाही जवाहर चौकात कुठेही रिक्षा पार्क करून तुंम्ही प्रवाशी घेऊ शकता अशी विशेष सुविधा राजापुरात आहे. यामुळे वाहतुक कोंडी झाली, गाडया थांबल्या, प्रवाशांना त्रास झाला त्याचे कुणालाच काही देणंघेणं नाही अशी राजापूरची अवस्था आहे.
आता नगर परिषद प्रशासनाने राजापुरात जवाहर चौक ते तालीमखाना रस्ता, जवाहर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ व अन्य भागात मोठया प्रमाणावर खर्च करून नो पार्किंगचे फलक लावले आहेते. जवाहर चौक ते नगर वाचनालय, नगर वाचनालय ते राजापूर हायस्कुल या रस्त्यावर गाडया उभ्या करू नयेत असे या फलकावर लिहिले आहे. प्रत्यक्षात मात्र या फलकांच्या खाली राजरोसपणे गाडया पार्क केल्या जात आहेत. नगर परिषदेने खरोखरच शहरातील वाहतुक कोंडी सुधारण्यासाठी हे फलक लावले आहेत की शोभेसाठी असा सवाल आता नागरिकांतुन व वाहन चालकांतुन उपस्थित केला जात आहे. तर नुसते फलक लावून काय होणार अंमलबजावणी कोण करणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगर परिषद व पोलीस प्रशासन यांनी एकमेकांशी समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. मात्र या दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्याने शहरात अनेकांकडून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. त्यामुळे याबाबत या दोन्ही विभागांनी गांभीर्याने विचार करणे आवश्कय आहे.

शहर बाजारपेठ रस्ता बनलाय पार्किंग झोन
राजापूर शहर बाजारपेठेतील रस्ता पादचारी, ग्राहक यांना ये जा करण्यासाठी की व्यापारी व अन्य वाहन चालक यांना आपल्या दुचाकी व अन्य वाहने पार्क करण्यासाठी असा प्रश्न पडावा इतकी या रस्त्यावर वाहने लावली जातात, त्यातच दुकानदारांकडून नियम मोडून रस्त्यावर आपली अतिक्रमणे केली जातात. याचा फटका पादचारी व ग्राहकांना बसतो, मात्र याकडेही पोलीस व नगर परिषद प्रशासन सोयीस्कर डोळेझाक करत आहे. त्यामुळे एकीकडे राजापुरात ग्राहक येत नाहीत अशी ओरड केली जाते, तर दुसरीकडे राजापुरातील वाहतुक कोंडी, बाजारपेठेतील गैरसोय यामुळे राजापुरात खरेदी नको रे बाबा असे म्हणून अनेक ग्राहक व पर्यटक राजापुरकडे पाठ फिरवतात याचाही विचार होणे आवश्यक आहे.