आमदार निलेश राणे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा करणार – रुपेश कानडे
स्वप्निल कदम (कुडाळ) :
माणगांव येथील केंद्र शाळा (कुंभारवाडी) इमारत अत्यंत नादुरुस्त अवस्थेत असल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ शाळेला भेट देत गट शिक्षण अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या पाहणीवेळी माणगांव जिल्हा परिषद सदस्य रुपेशजी कानडे, शिवसेना विभागप्रमुख सचिन धुरी, शहरप्रमुख दत्ता कोरगावकर, उपविभागप्रमुख अवि राणे, संतोष कुंभार, कौशल जोशी, लक्ष्मण धुरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमा कदम, हरी कुडतरकर, शाखाप्रमुख बाबू पालव, बाळा नाईक, कृष्णा धुरी, गणेश धुरी, खेमा सावंत, विवेक वारंग तसेच शिक्षकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान शाळेच्या इमारतीतील भिंतींना मोठे तडे गेले असून छतामधून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. काही वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तात्पुरत्या स्वरूपात आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी रुपेश कानडे यांनी सांगितले की, शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज वातावरणात शिक्षण मिळणे ही प्राथमिकता असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित पालकांनी शाळेची दुरवस्था लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना करून नवीन इमारतीचा प्रस्तावही विचारात घ्यावा, अशी मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक अहवाल वरिष्ठांकडे पाठवून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या शाळेची सुरक्षित व सुस्थितीत इमारत उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन समन्वयाने काम करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.











