राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या मौजे शीळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. रविवार १ मार्च पासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता बुधवार १८ मार्च रोजी होणार आहे. या दरम्यान शुक्रवार दि. ६ मार्च रोजी श्री नवलादेवी मातेची पालखी खुणा शोधणार आहे.
शिमगोत्सवाच्या विविध अंगापैकी खुणा शोधण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. खुणेच्या आदल्या रात्री लपवून ठेवलेली खुणा ग्रामदेवतेची पालखी शोध घेते. उत्कंठा वर्धक आणि दैवताची प्रचिती देणारा असा हा क्षण पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.
शीळ येथे सतीचा मळा या ठिकाणी ही खुणा घातली जाणार असून सकाळी ८.३० वाजता खुणेच्या ठिकाणी पालखी आणली जाणार आहे. खुणेनंतर श्री देव चव्हाटा मांड येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी तिर्थ प्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नवलादेवी ग्रामस्थ मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.












