जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्याकडून नियुक्ती जाहीर : युवा संघटनाला नवी ताकद…!
कणकवली – भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी भाजयुमो कणकवली तालुका कार्यकारिणी जाहीर केली असून त्यामध्ये कणकवली येथील युवा कार्यकर्ते राजाराम उर्फ प्रद्युम उदय मुंज यांची तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आली असून अधिकृत पत्राद्वारे याची माहिती देण्यात आली. श्री. मेस्त्री यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राजाराम उर्फ प्रद्युम मुंज हे भारतीय जनता पक्ष व भाजयुमोमध्ये सक्रियपणे कार्यरत असून विविध सामाजिक, राजकीय तसेच संघटनात्मक उपक्रमांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी त्यांच्यावर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
या नियुक्तीमुळे कणकवली तालुक्यात भाजयुमोचे संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राजाराम उर्फ प्रद्युम मुंज यांच्या नियुक्तीबद्दल भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी बोलताना प्रद्युम मुंज म्हणाले की, केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा वर्गासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवित तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या पदाचा उपयोग करणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कणकवली येथील नारायण राणे संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर प्रमुख अण्णा कोदे, समीर प्रभू गावकर, साखळी गावचे उपसरपंच प्रज्वल वर्दम, सागर राणे, भैय्या आळवे, नंदू वाळके, वृषभ मेनकुदळे, सुरज ओरसकर, विश्वनाथ दळवी , ऋतिक नलावडे, मंगेश म्हसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











