भुईबावड्यात शिमगोत्सवाची दिमाखदार सुरुवात

ढोल-ताशांच्या गजरात श्री देव रवळनाथ पंचायतन पालखीचे मांडावर आगमन; भक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

 स्वप्निल कदम (भुईबावडा) :    सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील पारंपरिक शिमगोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. होळीच्या मांडावर श्री देव रवळनाथ पंचायतन पालखीचे भव्य मिरवणुकीने आगमन झाल्याने ग्रामस्थांसह भक्तभाविकांचा उत्साह गगनाला भिडला.

श्री देव रवळनाथ मंदिर येथून निघालेली पालखी ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत भुईबावडा बाजारपेठेतून मिरवणुकीने होळीच्या मांडावर दाखल झाली. यावेळी “श्री देव रवळनाथाचा जयघोष” आणि भक्तांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.

होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालणारा हा पारंपरिक शिमगोत्सव जिल्हाभरात प्रसिद्ध आहे. होळी उभी राहिल्यानंतर मांडावर पालखी येण्याची ग्रामस्थांसह भक्तभाविकांना मोठी आतुरता असते. देवाचा कौल झाल्यानंतर पालखी मांडावर येते, यालाच स्थानिक बोलीभाषेत “देव मांडावर आले” असे म्हटले जाते. या क्षणाची येथील ग्रामस्थ वर्षभर प्रतीक्षा करत असतात.

वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणून या शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. परंपरेनुसार हा उत्सव शांततेत व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. गावातील मुंबईस्थित चाकरमानीही मोठ्या संख्येने या उत्सवासाठी उपस्थित राहतात.

पालखी मांडावर आल्यानंतर नित्यपूजा, ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे असे धार्मिक कार्यक्रम सुरू होतात. तसेच ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणाऱ्या या उत्सवात दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.

माहेरवाशीनींचे श्रद्धास्थान असलेल्या या उत्सवात माहेरवाशीनींची विशेष उपस्थिती असते. देवाचा कौल झाल्यानंतर गावातील पारंपरिक मानपानानुसार ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडतो.

दरम्यान, भक्तभाविकांनी तसेच माहेरवाशीनींनी ओटी भरणे व दर्शनासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भुईबावडा गावचे मुख्य मानकरी श्री आकोबा मोरे पाटील यांनी केले आहे.