कणकवलीत जन्मतः कापलेले ओठ-टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

कणकवली : जन्मतः कापलेले ओठ व टाळू (Cleft Lip & Palate) असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे होणार आहे.

या शिबिरात पात्र रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढे मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच रुग्णांसाठी भोजन, वास्तव्य व प्रवासाची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी ६ महिन्यांवरील वयोगटातील रुग्ण पात्र असून, यापूर्वी शस्त्रक्रिया झालेली असली तरी अशा रुग्णांनाही तपासणीसाठी उपस्थित राहता येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

जन्मतः ओठ किंवा टाळू कापलेले असल्यामुळे अनेक मुलांना बोलण्यात, खाण्यात तसेच सामाजिक आयुष्यात अडचणी येतात. अशा रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवजीवन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या शिबिराबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी 9404740490, 9421235586, 9403636454, 9673365988 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.