खेड BREAKING : लोटे औद्योगिक वसाहतीतील DKIC केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ५ ते ६ कामगार गंभीर जखमी

खेड | राकेश कोळी

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये शुक्रवारी दुपारी भीषण स्फोटाची घटना घडली. लोटे एमआयडीसीमधील DKIC प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीत झालेल्या या स्फोटात सुमारे पाच ते सहा कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. स्फोट इतका तीव्र होता की परिसरात मोठा आवाज झाला आणि कंपनी परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये सलग दोन स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांना तातडीने लोटे औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कंपनी परिसरात तपास सुरू असून नेमका स्फोट कशामुळे झाला आणि त्यामागील कारण काय आहे याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या घटनेमुळे लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.