वागदे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशान्वये कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीने वागदे मंडळ स्तरावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी गोपूरी आश्रम बहुउद्देशीय सभागृह, वागदे (मे. नाईक पेट्रोल पंप यांच्या मागील बाजूस) येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे.

या शिबिरात नागरिकांच्या विविध महसुली कामांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. रेशन कार्डमधील नाव कमी करणे किंवा नव्याने दाखल करणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे, जातीचे व उत्पन्नाचे दाखले, ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती, अकृषिक (एन.ए.) परवानगीबाबत मार्गदर्शन यांसह विविध संजय गांधी योजना अंतर्गत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच तुकडेबंदी विरुद्ध व्यवहाराबाबत शेरे काढण्यासाठी अर्जही स्वीकारले जाणार आहेत.

एकूण १४ महत्त्वाच्या सेवा या शिबिरामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने वागदे महसूल मंडळ परिसरातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.