दोन मर्डर आणि चोरीचे गुन्हे सोडवणाऱ्या ‘विराट’ चा आकस्मिक मृत्यू

९ वर्षांची सेवा बजावणाऱ्या सच्चा साथीदाराला पोलीस विभागाकडून सलामी देत साश्रू नयनांनी अखेरचा सलाम

रत्नागिरी | अनघा निकम – मगदूम  

दोन खून, एक अपहरण आणि दहा चोऱ्यांचे गुन्हे आपल्या अफाट हुशारीने उघडकीस आणणारा रत्नागिरी पोलीस दलाचा सच्चा साथीदार ‘विराट’ या पोलीस श्वानाचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. २०१७ पासून पोलीस दलाची शान बनलेल्या या डोबरमन जातीच्या विराटने आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावत तपासाला नवी दिशा दिली होती.

डॉबरमन जातीचा असलेला विराट २०१७ साली रत्नागिरीच्या पोलीस दलात दाखल झाला होता. गेल्या ९ वर्षांच्या त्याच्या  कारकीर्दीत आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यात त्याचा महत्वाचा सहभाग होता. यामध्ये प्रामुख्याने २ खुनाचे गुन्हे, १ अपहरणाचा गुन्हा आणि १० चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हेगारापर्यंत पोहोचताना विराटची चपळाई आणि कुशाग्रपणा, वासावरून गुन्ह्याचा क्लू पोलिसांना मिळवून देण्यात त्याचा हातखंडा होता, ज्यामुळे पोलीस तपासाला मोठी गती मिळत असे.

अशा विश्वासू साथीदाराचा आज आकस्मिक मृत्यू झाला आणि पोलीस दलावर शोककळा पसरली. आपला एक सच्चा साथीदार गमावल्याची भावना सर्वांमध्ये होती. या लाडक्या साथीदाराला पोलिसांच्या बॉम्ब शोध नाश पथकाच्या कार्यालयाच्या आवारात शेवटचा निरोप सुद्धा साश्रू नयनांनी आणि शासकीय इतमामाने देण्यात आला.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, पोलीस उपनिरीक्षक शेगाबेन मावची, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण घाग आणि इतर पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या सहकाऱ्याला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

विराटला घडवण्यात आणि त्याच्याकडून कामगिरी करून घेण्यात त्याचे हॅन्डलर पोलीस हवालदार महेश हरचिरकर आणि पोलीस हवालदार संदेश कोतवडेकर यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या सोबत विराटने अनेक मोहिमा फत्ते केल्या होत्या. या सर्वांना सुद्धा कुटुंबातील एक सदस्य गेल्याची भावना निर्माण झाली होती.