आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी जिल्हा कोकण विभागाने साधला अनोखा संगम 

एकत्र साजरा केला मराठी भाषा गौरव दिन आणि महिला दिवस 

रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका, रत्नागिरी जिल्हा, कोकण विभागाने “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त” महाविद्यालयातील मुलांसाठी काही विषय देऊन निबंध तसेच काव्य स्पर्धा आयोजित केली होती. आयोजन आणि नियोजन तसेच परीक्षण संस्थेच्या सदस्या उमा जोशी तसेच डाॅ चित्रा गोस्वामी यांनी केले. त्याचा बक्षीस समारंभ काल महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात संपन्न झाला. काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांची नावे सेजल मेस्त्री(प्रथम), कृपा पाडळकर व वृषाली कोवळे (द्वितीय विभागून) आणि रत्नेश कांबळे व विस्मया कुलकर्णी (तृतीय विभागून) तसेच निबंध लेखन स्पर्धेतील विजेते आहेत प्रगती शिंदे (प्रथम), सेजल मेस्त्री (द्वितीय) आणि वसुंधरा जाधव (तृतीय). विजेत्यांना दोन्ही परीक्षक, जेष्ठ साहित्यिक सदस्या अर्चना देवधर आणि अध्यक्ष सुनेत्रा जोशी व कार्याध्यक्षा ऋतुजा कुलकर्णी यांचे हस्ते सन्मानपत्र तसेच पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तरूणाई लेखनाकडे वळावी तसेच संस्थेत कार्यरत व्हावी हा सुद्धा एक उद्देश होताच.

महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी जिल्हा सभासदांचे आणि विजेत्या स्पर्धकांचे सुद्धा सादरीकरण झाले. कुणी लेख वाचन केले तर कुणी काव्य वाचन केले. या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा विजय जोशी आणि आसिले रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी कार्याध्यक्ष ऋतुजा कुळकर्णी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि सरस्वती पुजनाने झाली.त्यानंतर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सुनेत्रा जोशींनी प्रास्ताविक केले. त्यात महिलांनी स्वतःसाठी, छंदासाठी दिवसातला निदान एक तास तरी द्यावा असे आवर्जून सांगितले. तसेच नवोदितांना लेखनासाठी थोडक्यात मार्गदर्शन केले. नंतर सगळ्या सभासदांनी सादरीकरण केले. आणि बक्षीस समारंभ होऊन आभार प्रदर्शन ऋतुजा कुळकर्णी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुराधा आपटे यांनी उत्तमपणे केले.कार्यक्रमाला एकूण ३० लेखनप्रेमी उपस्थित होते. अशी माहिती कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी यांनी दिली..