सावंतवाडी:स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने, स्व. प्रा. मिलिंद द. भोसले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आपण व्यक्त होऊया!’ समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजल्यापासून जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे होणार आहे.
ही स्पर्धा दोन गटांत होणार असून, पहिल्या गटात इयत्ता १ ली ते २ री साठी रंगभरण, तर दुसऱ्या गटात इयत्ता ३ री ते ४ थी साठी चित्रकला स्पर्धा होईल. चित्रकला स्पर्धेसाठी ‘माझे कुटुंब’, ‘माझी शाळा’, ‘माझे सुंदर गाव/शहर’ हे विषय देण्यात आले आहेत. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकांना आकर्षक बक्षिसे व सहभागींना प्रमाणपत्रे दिली जातील.
स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून दुपारी ३:३० वाजता नावनोंदणी सुरू होईल. चित्र काढण्यासाठी २ तासांचा वेळ दिला जाईल. कागद आयोजकांतर्फे दिला जाईल, मात्र इतर साहित्य (पेन्सिल, रंग, पॅड) स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे.
याच कार्यक्रमात ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी’ यांना स्व. किशोर दत्ताजीराव भोसले स्मृती आरोग्य व सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९०७५११९४७३ किंवा ९०११६०४५०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












