सावंतवाडी येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
शिबिरात ७ हजारांहून अधिक दाखल्यांचे वाटप

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती, फळबाग आणि सूक्ष्म फळप्रक्रिया उद्योगांकडे वळले पाहिजे. महिला जेवढ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, तेवढा सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या आघाडीवर राहील, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. हे शिबिर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ स्तरावर आयोजित करण्यात आले होते.
आपल्या भाषणात आमदार केसरकर पुढे म्हणाले की, शेतीचे यांत्रिकीकरण होत असल्याने महिला भगिनींनी आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘श्री’ पद्धतीने भातशेती करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल. तसेच नारळापासून नीरा व साखर बनवणे, आईनच्या झाडावर रेशीम उत्पादन घेणे आणि हळद लागवड यांसारख्या विविध उपक्रमांतून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. सिंधुरत्न योजना, संजय गांधी निराधार योजना आणि घरकुल योजनांच्या माध्यमातून महिलांना व गरजूंना सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात प्रांताधिकारी विरसिंग वसावे यांनी प्रास्ताविक केले, तर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आढावा मांडला. सावंतवाडी उपविभागात ३१ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून एकूण ७ हजार १५४ दाखले व विविध शासकीय सेवांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये ८/अ मधील नोंदी व फेरफारविषयक २ हजार ६९७ अर्जांचा निपटारा करण्यात आला, नवीन रेशनकार्ड वाटप व दुरुस्तीची ५ कामे पूर्ण झाली, संजय गांधी व सामाजिक सहाय्य योजनेचे २३, विविध महसुली दाखले ८८, वयोश्री व इतर योजनांचे १ हजार ४९१, कुणबी दाखले ८१, अनुसूचित जात/जमात प्रमाणपत्रे ३२, इतर मागासप्रवर्ग दाखले १०, उत्पन्नाचे दाखले ३७३ आणि इतर विविध महसुली सेवा व दाखले २ हजार ३५४ अशा एकूण ७ हजार १५४ सेवांचे वितरण करण्यात आले.
मुख्य शिबिराच्या ठिकाणी प्रत्यक्ष ३ हजार ४४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला, तर आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते १७३ प्रकारच्या दाखल्यांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. यामध्ये गेळे येथील ३४ लाभार्थ्यांना ७/१२ उतारे, कुंभार समाजातील ८५ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, तर चौकुळ गावातील बेरड समाजातील २८ नागरिकांना हक्काच्या घरांसाठी जमिनीचे दाखले देण्यात आले. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चौकुळ येथील बेरड समाजातील नागरिकांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी ई-पिक पाहणी आणि ई-केवायसीचे महत्त्व पटवून देण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी एक नाटिका सादर केली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सभापती सुष्मिता जाधव, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, दोडामार्ग उपसभापती गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, वीजय नाईक, सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य स्नेहा नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ले गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सावंतवाडी गटविकास अधिकारी निलेश जाधव, भूमी अभिलेख उपअधीक्षक विनायक ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












