शिवी दिल्यास २०० रुपये दंड
चौकूळ : जागतिक महिला दिनानिमित्त चौकूळ येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ४ मराठीवाडी शाळेने समाजाला सकारात्मक संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम राबविला. शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत “शिवीमुक्त शाळा व शिवीमुक्त वाडी” करण्याचा संकल्प करत शिवीगाळ न करण्याची शपथ घेतली. शिवीगाळ रोखण्यासाठी वाडीत कोणी शिवी दिल्यास रु. २०० दंड आकारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
८ मार्च रोजी सर्वत्र महिला दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. मात्र चौकूळ शाळेने महिला सन्मानाचा संदेश देत हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत, घरी तसेच परिसरात कुठेही शिवीगाळ करणार नसल्याची शपथ घेतली.
“कोणतीही शिवी दिल्यास ती शेवटी आईलाच म्हणजेच एका स्त्रीलाच लागते. एका बाजूला महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला शिवीच्या माध्यमातून महिलेचा अनादर करायचा हे योग्य नाही,” असा विचार विद्यार्थ्यांपुढे मांडत त्यांना सुसंस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
लहान मुले सहज शिव्या वापरतात; मात्र त्यातून शिस्त, संस्कार आणि सामाजिक वातावरण बिघडते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि समाजात सुसंवाद वाढावा या उद्देशाने “शिवीमुक्त शाळा – शिवीमुक्त वाडी” हा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांनी दिली.
या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमास शाळेचे सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सायली गावडे, ग्रामपंचायत सदस्य संजना गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
अशी आहे शपथ :
“मी आज महिला दिनाच्या निमित्ताने अशी शपथ घेतो/घेते की, मी कोणालाही शिवीगाळ करणार नाही. स्त्रिया, मुली तसेच सर्व व्यक्तींचा आदर राखून नम्र आणि सुसंस्कृत भाषेचा वापर करेन.
मी माझ्या शाळेत, घरात आणि वाडीत शिवीगाळ होऊ नये यासाठी प्रयत्न करेन. कोणी शिवीगाळ करत असल्यास त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन.
स्वच्छ, सुसंस्कृत आणि आदरयुक्त समाज घडवण्यासाठी शिवीमुक्त वाडी करण्याचा मी प्रामाणिकपणे संकल्प करतो/करते.”











