दोडामार्ग प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकाला लक्ष्य करत, डेटा प्रोटेक्टर बोर्ड ऑफ इंडिया (Data Protector Board of India) आणि बँक खात्यात करोडो रुपये जमा झाल्याचे खोटे कारण देऊन दोडामार्ग येथील एका ७६ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची ५ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफ.डी. (FD) च्या कागदपत्रांच्या बहाण्याने लुटले!
सविस्तर वृत्त असे की, शिवराम कृष्णाजी राणे (वय-७६, रा. साटेली भेडशी, भोमवाडी, ता. दोडामार्ग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ ते १९ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान ही फसवणूक करण्यात आली.
गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी दोन मुख्य पद्धती वापरल्याचे समोर आले आहे:
आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईलवरून एका महिलेस अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून धमकी दिल्याबद्दल तक्रार असल्याचे सांगण्यात आले. राहुल रॉय नामक एका अनोळखी इसमाने आपण ‘डेटा प्रोटेक्टर बोर्ड ऑफ इंडिया’ मधून बोलत असल्याचे सांगितले.
यात भिसे आणि पाटील नावाच्या इतर अनोळखी व्यक्तींनी फिर्यादींच्या बँक खात्यात करोडो रुपये जमा झाल्याचे खोटे सांगितले. या रकमेसाठी फिर्यादींच्या बँकेतील एफ.डी. (Fixed Deposit) ची कागदपत्रे के.वाय.सी. (KYC) साठी आवश्यक आहेत, असे सांगण्यात आले.
के.वाय.सी.च्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादींना त्यांची एफ.डी.मधील रक्कम बँक ऑफ इंडियाच्या त्यांच्या सेविंग खात्यात जमा करण्यास सांगितली. त्यानंतर आर.टी.जी.एस. (RTGS) फॉर्म भरून, ती रक्कम ‘नेमीचंद’ नावाच्या व्यक्तीच्या पंजाब नॅशनल बँकेच्या (बँगलुरु) खात्यावर जमा करण्यास भाग पाडले.
अशा प्रकारे, आरोपींनी फिर्यादींच्या खात्यातून तब्बल ₹ ५,००,२०८/- (पाच लाख दोनशे आठ रुपये) काढून घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.
माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच, दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी १.३० वाजता तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेले कलम:
भारतीय दंड संहिता (IPC) कलम १३५ (BN.S.135), ३१८(४)
माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act), २००८ चे कलम ६६(c) आणि ६६(D) (Identity Theft, Cheating by personation using computer resource)
सदर गुन्ह्याचा पुढील तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे करीत आहेत. जेष्ठ नागरिकांनी अनोळखी फोन कॉल्स आणि ऑनलाईन व्यवहाराबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.











