वैभववाडी पंचायत समिती सभापतीपदी सिद्धेश रावराणे तर उपसभापतीपदी साची कोलते बिनविरोध

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे सिद्देश दिलिप रावराणे यांची तर उपसभापतीपदी साची सचिन कोलते यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर त्यांचे जल्लोषात अभिनंदन करण्यात आले.

वैभववाडी पंचायत समितीच्या सहा पैकी सहा सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचे वैभववाडी पंचायत समितीवर एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती भाजपचे होणार हे निश्चित होते.

सोमवारी सकाळी ११ वाजता वैभववाडी पंचायत समिती कार्यालयात सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी सभापती पदासाठी लोरे पंचायत गणातून निवडून आलेले सिद्देश दिलिप रावराणे यांनी तर उपसभापती पदासाठी साची सचिन कोलते यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्याकडे दाखल केला.

अर्ज दाखल केल्यानंतर सभापती व उपसभापती पदासाठी एक, एक अर्ज असल्यामुळे रावराणे व कोलते यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, मंगेश लोके, साधना नकाशे, बँक संचालक दिलिप रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, शारदा कांबळे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगध्यक्ष प्रदीप रावराणे, स्वप्नील खानविलकर, हुसेन लाजकर, महेश संसारे, सज्जनकाका रावराणे, सीमा नानीवडेकर, अंबाजी हुंबे, नेहा माईणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवड जाहीर केली. यावेळी लोरे पंचायत समिती व उंबर्डे पंचायत समिती गणातील भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर वैभववाडी येथील दत्त मंदिरात जाऊन सभापती, उपासभापती यांनी दर्शन घेतले.

सभापती सिद्धेश रावराणे म्हणाले, माझ्यासारख्या तरुणावर सभापती पदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली आहे. कमी वयात मला मोठी संधी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. वैभववाडी तालुक्यातील विकास कामांबरोबरच शैक्षणिक व महिला व युवकांसाठी काय विशेष करता येईल यासाठी आम्ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. माझे पंचायत समितीचे सर्व सहकारी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व भाजपचे सर्व पदाधिकारी या सर्वांना विश्वासात घेऊन मी वैभववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन.

उपासभापती साची कोलते म्हणाल्या, आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून महिला सक्षमीकरण बचत गटांना पुनर्जीवित करणे, महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे.