खेड (प्रतिनिधी) : शिमगोत्सवाच्या आनंदात सहभागी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोंडीवली रोहिदासवाडी येथील संतोष भागोजी कोंडविलकर (वय ४९) यांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने कोंडीवली परिसरासह मुंबईतील नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
मुंबई येथे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करणारे संतोष कोंडविलकर हे शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी आले होते. रविवार, दिनांक ८ मार्च रोजी त्यांनी कुटुंबीय आणि ग्रामस्थांसोबत मोठ्या उत्साहात देवीच्या पालखीचे स्वागत केले. रोहिदासवाडी येथील विठ्ठल मंदिरात पालखी आगमन झाल्यानंतर त्यांनी भक्तिभावाने पालखी नाचवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला. गावात सणाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच दुसऱ्याच दिवशी पहाटे अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
संतोष कोंडविलकर हे स्वभावाने अत्यंत साधे, मनमिळावू आणि मदतीला सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व होते. गावाच्या विविध विकासकामांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेत असत. त्यामुळे “संतोष दादा” या नावाने ते परिसरात ओळखले जात होते. त्यांच्या या प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कोंडीवली गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवार, दिनांक १० मार्च रोजी कोंडीवली रोहिदासवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. संतोष कोंडविलकर यांच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.













