खेड (प्रतिनिधी) : सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (एन.एस.ओ.) या द्वितीय पातळीवरील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, खेड येथील रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
या परीक्षेत इयत्ता सहावीतील कु. अर्णव घुमरे याने ६० पैकी ६० गुण मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ वा क्रमांक तर विभागीय स्तरावर ३ रा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याला रु. २५०० रोख पारितोषिकासह विभागीय रौप्यपदक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे कु. आरव सुर्वे यानेही उत्तम कामगिरी करत विभागीय प्राविण्य प्रमाणपत्र व रु. ५०० चे पारितोषिक मिळवले.
इयत्ता आठवीतील कु. प्रणव गांगर्डे याने उल्लेखनीय यश संपादन करत रु. १००० रोख पारितोषिकासह विभागीय कांस्यपदक पटकावले, तर कु. शौर्य गावस यालाही रु. ५०० पारितोषिक व विभागीय प्राविण्य प्रमाणपत्र मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शाळेचा मान उंचावला आहे.
या यशामागे शाळेतील विज्ञान विषय शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची चिकाटी महत्त्वाची ठरली. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












