सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रुग्णवाहिकेसाठी ५१ हजरांची देणगी

सावंतवाडी । प्रतिनिधी :सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही रुग्णांना तत्काळ सेवा देणारी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सेवाभावी संस्था आहे, असे गौरवोद्गार अण्णा देसाई यांनी काढले. प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेत, रुग्णांच्या सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडीच्या वतीने ५१ हजार ५०० रुपयांची रोख देणगी सुपूर्द करण्यात आली.

अण्णा देसाई व प्राध्यापक सुभाष गोवेकर यांच्या पुढाकारातून ही मदत देण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्हास्तरावर करत असलेले कार्य अतिशय उत्कृष्ट असून, याचा अनुभव नेहमीच येतो, अशी भावना यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच पाठीशी राहील, अशी ग्वाही रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यावेळी म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात, हे कार्य प्रेरणादायी आहे. ज्येष्ठ नागरिक तरुणांप्रमाणेच उत्साहाने आणि मनमोकळेपणाने शहरात सामाजिक कार्य करत आहेत, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यावेळी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघाला त्यांच्या बहुमूल्य सहकार्याबद्दल आभार पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर, सचिव प्रकाश राऊळ, उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, सहसचिव विदुला पाटकर, सल्लागार अण्णा देसाई, सदस्या मेघना राऊळ व इतर सदस्य उपस्थित होते. तसेच सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, ‘सकाळ’चे वितरण अधिकारी गुरुनाथ कदम, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांचीही उपस्थिती होती.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी उपक्रमाची ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेल्या या दखलीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.