▪️चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात ५८ प्रस्ताव मंजूर
▪️४१ लाभार्थ्यांना मिळाले प्रत्येकी दोन लाख रुपये
मसुरे | झुंजार पेडणेकर :घरचा कर्ता पुरुष अचानक सोडून गेल्यावर कोसळणाऱ्या दुःखाच्या डोंगरातून शेतकरी कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून मिळणारी दोन लाख रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम संकटकाळात कुटुंबाचा आर्थिक कणा बनत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत ४१ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण ८२ लाख प्राप्त झाले आहेत. मृत्यु बाबतचे १६ आणि अपंगत्व १ प्रस्ताव शासनाकडून निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना रक्कम वर्ग केली जाणार आहे. या कालावधीत मृत्यू बाबत एकूण ९२ तर अपंगत्व ४ असे एकूण ९६ प्रस्ताव जिल्ह्यातून प्राप्त झाले होते. त्यापैकी मृत्यू बाबत ५६ तर अपंगत्व बाबत २ असे ५८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
काय आहे योजना ?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेती करताना किंवा अन्य अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे हा आहे. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये,दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास२ लाख रुपये, एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास १ लाख रुपये अनुदान मिळते.
* पात्रता आणि अटी-
वय १० ते ७५ वर्षे वयोगटातील शेतकरीअसावा. ७/१२ उताराधारक सर्व शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांचे कुटुंबातील अन्य सदस्यही काही अटींनुसार पात्र ठरू शकतात.रस्ते /रेल्वे अपघात, वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, पाण्यात बुडून मृत्यू, उंचावरून पडणे, यंत्राद्वारे अपघात किंवा विषबाधा यांसारख्या अपघातांचा समावेश होतो.नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली झालेला अपघात किंवा गुन्हेगारी कृत्य करताना झालेला अपघात यामध्ये लाभ मिळत नाही.
▪️प्रस्ताव करताना आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारा आणि ८-अ उतारा. मृत्यूचा दाखला (मृत्यू झाल्यास).गाव नमुना ६-क (वारसाची नोंद) ६- ड फेरफार पत्रक. .वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड किंवा मतदार कार्ड). प्रथम माहिती अहवाल (FIR) आणि स्थळ पंचनामा. पोस्टमार्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल). बँक पासबुक झेरॉक्स (वारसदाराचे).
* अर्ज कुठे कराल?
अर्ज करण्याची पद्धत आता अधिक सोपी करण्यासाठी MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुद्धा आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करून दिल्यास अर्ज पूर्ण भरून देण्याची सुविधा आहे.अपघाताच्या घटनेनंतर ४५ दिवसांच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
बळीराजासाठी वरदान ठरणारी योजना –
शेतीकामात ओढवणाऱ्या अनपेक्षित संकटामुळे हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ मोठा आधार ठरत आहे. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्याच्या नावावर शेत जमिनी नसल्याने वारस तपास करून घेणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे. कारण प्रस्ताव नाकारला जाण्यामध्ये जमिनीच्या सात बारा सध्याच्या शेतकऱ्याच्या नावावर नसणे हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबांचा विस्कटलेला संसार पुन्हा सावरण्यास मदत होत असून, ही योजना बळीराजासाठी खऱ्या अर्थाने ‘वरदान’ ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.













