शेतजमिनीतील कामाबाबत ग्रामस्थ शेतकऱ्यांची व्यक्त केली नाराजी
चौके ग्रामपंचायत सरपंच ग्रामस्थांशी चर्चा
शेतकरी ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच काम करा : नगराध्यक्ष व प्रशासनाच्या सूचना
चौके प्रतिनिधी :- मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर मालवण नव्या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. धामापूर ते चौके प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत खोदाई पूर्ण झाली. पुढे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतून या नवीन नळ पाणी योजनेची खोदाई होत असल्याने या लाईनवर ग्रामस्थ शेतकरी यांनी विरोध केला. ग्रामपंचायत चौके यांच्याकडून याबाबत त्यावेळी मालवण नगरपरिषद प्रशासनास पत्र देण्यात आले होते. दरम्यान यां पत्रावर तसेच काही ठिकाणी काम का थांबले याबाबत नगरपालिका सभेत चर्चा झाली. दरम्यान, बुधवारी सकाळी मालवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण,
समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, नीना मुंबरकर, मेघा सावंत, मुख्याधिकारी प्रतीक थोरात आणि संबंधित कामावर नेमलेले अधिकारी अशी संपूर्ण टीम चौके ग्रामपंचायत येथे दाखल झाली. यावेळी सरपंच पी के चौकेकर ग्राम अधिकारी निकम भाऊ ग्रामस्थांनी उपस्थित सर्व नगरपालिका सदस्यांचे स्वागत केले.
यानंतर या अपूर्ण कामाबद्दल चर्चा करण्यात आली या चर्चेत संपूर्ण नगरपालिका अधिकारी यांचे चौके सरपंच पी के चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य राजन गावडे, सामाजिक कार्यकर्ते बिजेन्द्र गावडे, संतोष गावडे नितीन गावडे, अजित गावडे यांनी सहभाग घेत नळ पाणी योजनेला आमचा कोणताही विरोध नाही असे सांगत मात्र चौके गावात लाईन खोदाई करताना ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून मशीनद्वारे पाईपलाईन खोदाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच आलेल्या सर्व नगरपालिका टीमला पाईपलाईनचे काम चालू असलेल्या ठिकाणी नेत या नळ पाणी योजनेच्या लाईन मुळे भविष्यात शेतीचे होणारे नुकसान दाखवून दिले. तसेच चौके प्राथमिक आरोग्य केंद्र ते चौके येथील नळपाणी योजनेची पाण्याची टाकी इथपर्यंत नेण्यात येणारी लाईन जवळ पडणाऱ्या रस्त्यालगत न घेता शेतकऱ्यांच्या शेतीतून मशीनद्वारे सुलभ काम कसे होते होईल यासाठी होत असलेले काम नगरपालिकेच्या सर्व टीमला ग्रामस्थांनी दाखवून दिले. यावेळी संबंधित कामाच्या ठिकाणी असलेले सुपरवायझर इंजिनिअर यांच्या बाबत ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाचला आणि आपली भूमिका मांडली. नगराध्यक्ष नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून यापुढे ग्रामस्थ शेतकरी यांच्याशी चर्चा करूनच काम केले जाईल असे सांगितले. एकूणच या कामाच्या निमित्ताने नगरपालिकेच्या टीमने भर रखरखत्या उन्हात प्रत्यक्ष जागेवर येऊन कामाची पाहणी करत कश्या पद्धतीने काम चालले आहे याचाही अनुभव घेतला.












