राजापूर (वार्ताहर): आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आशिष मालवणकर मित्रमंडळाचे वतीने राजापूरात १७ मार्च पासून भव्य ओव्हरआर्म एनएनआर कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वरचीपेठ येथिल राजीव गांधी क्रिडांगणावर १७ ते २२ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास रोख रूपये २० हजार १७ व आकर्षक चषक, द्वितीय विजेत्या संघास रोख रूपये १२ हजार १७ व आकर्षक चषक तर तृतीय व चतुर्थ विजेत्या संघास रोख रूपये २०१७ व आकर्षक चषक देवून सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील संघांना प्रथम प्राधान्य. वाडी आणि गाव गटातून स्पर्धा पार पडेल. सामने लीग पद्धतीने खेळवले जातील. ४ संघांचा एक गट असेल. प्रत्येक संघ लीग फेरीतील ३ सामने खेळेल. एका गटातून २ टॉपचे संघ पुढच्या बाद (नॉकआउट) फेरीत प्रवेश करतील. प्रत्येक सामना ४ षटकांचा (ओव्हर्सचा) राहील. कमीत कमी ३ गोलंदाज गोलंदाजी करू शकतील. वाडी गटातून खेळणारा खेळाडू अथवा संघ गाव गटातून खेळू शकेल. उपांत्य फेरीसाठी प्रत्येक संघाला एक ‘आयकॉन’ खेळाडू घेण्याची मुभा असेल. आयकॉन खेळाडू राजापूर तालुक्यातील असावा. सामना बरोबरीत (टाय) सुटल्यास दोन्ही संघांना समसमान गुण दिले जातील.
स्पर्धेच्या नावनोंदणी व अधिक असेल माहितीसाठी आशिष मालवणकर, बाळू चव्हाण व संतोष बाकाळकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.












