निसर्ग जपण्यासाठी कोलझरवासियांचे देवापाशी साकडे

शिमगोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प

दोडामार्ग । प्रतिनिधी : निसर्गसंपन्नतेचा वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात ‘गावपण’ आणि ‘पर्यावरण’ जपण्यासाठी लोकचळवळ उभी राहत आहे. कोलझर येथील प्रसिद्ध शिमगोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांनी जल आणि जंगल संवर्धनाचा ऐतिहासिक संकल्प केला. बाह्य शक्तींकडून होणाऱ्या निसर्गावरील आक्रमणाविरोधात एकवटलेल्या गावाने, या लढ्याला बळ मिळावे आणि गावची संस्कृती अबाधित राहावी, यासाठी ग्रामदैवतासमोर सामूहिक गाऱ्हाणे घातले.

कोलझरचा यंदाचा शिमगोत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता, तो निसर्ग रक्षणाच्या चळवळीचे व्यासपीठ ठरला. गेल्या काही काळापासून गावातील डोंगराळ जमिनी बाहेरील गुंतवणूकदारांनी खरेदी करून स्थानिकांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि अवैध उत्खनन सुरू केले होते. स्थानिकांच्या मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करण्याचे प्रकारही समोर आले होते. या सर्व प्रकारांना गावाने संघटित होऊन विरोध केला आहे. भविष्यात आपल्या जमिनी विकणार नाही आणि निसर्गाचा हा ऱ्हास थांबवू, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला असून, त्यांच्या या भूमिकेचे राज्यभरात कौतुक होत आहे.

 

कोलझरमध्ये सात दिवसांच्या या उत्सवाची सांगता ११ मार्च रोजी रात्री उशिरा पारंपरिक ‘न्हावाण’ (तीर्थ) सोहळ्याने झाली. या सोहळ्यासाठी चाकरमानी, माहेरवाशिणी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गाऱ्हाण्यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी संपूर्ण गावाच्या वतीने देवासमोर साकडे घातले. गावाच्या पर्यावरण संवर्धनाच्या लढ्याला दैवी पाठबळ मिळावे आणि निसर्गशत्रूंना रोखण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

 

*गाऱ्हाण्याने घातले साकडे*

“आमच्या वाडवडिलांनी पिढ्यानपिढ्या हे जंगल आणि पाणी जपले आहे. पण आज त्यावर संकट येत आहे. गावाचे अस्तित्व आणि संस्कृती जपण्यासाठी आम्ही निसर्ग रक्षणाची जी एकजूट दाखवली आहे, तिला यश दे. पर्यावरणावर घाला घालणाऱ्या आणि डोंगराची व झऱ्यांची वाट लावणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तींना रोखण्यासाठी आम्हाला बळ दे. आमच्या जंगलाची एकही काडी कुणाच्याही ताब्यात जाऊ नये. तसेच हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टळू दे, हीच चरणी प्रार्थना!” असे गाऱ्हाणे यावेळी घालण्यात आले.

 

*सांस्कृतिक चळवळीला पर्यावरणाची जोड*

कोकणातील शिमगोत्सव हा मुळातच निसर्गाशी जोडलेला सण आहे. मात्र, कोलझर ग्रामस्थांनी या उत्सवाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. जमिनीच्या विक्रीतून मिळणाऱ्या तात्पुरत्या फायद्यापेक्षा शाश्वत निसर्ग महत्त्वाचा आहे, हा संदेश या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला आहे.