वागदेतील महिलांची फसवणूक प्रकरणी सुरेश काकडेसह पत्नीला अटक करण्याचीही मागणी

कणकवली : वागदे गावातील महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावावर विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्जे काढून सुमारे ३० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश खंडू काकडे याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात सहभाग असलेल्या त्याची पत्नी रुपाली काकडे हिलाही सहआरोपी करून त्वरित अटक करावी, अशी मागणी वागदे येथील महिला व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्याकडे केली.

 

वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक नलवडे यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, सुरेश काकडे याने मुलांना मोफत शिकवणी देण्याचे आमिष दाखवून गावातील महिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वागदे येथील सुमारे १५ ते १६ महिलांच्या नावावर विविध फायनान्स कंपन्यांकडून सुमारे ३० लाखांचे कर्ज काढून त्यांची फसवणूक केली.

 

तसेच काकडे याने स्वतः घेतलेल्या वाहनासाठी काही ग्रामस्थांना जामीनदार ठेवले होते. मात्र सध्या काकडे बेपत्ता असल्याने बँकेकडून जामीनदारांनाही नोटीसा येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

यावेळी सरपंच सावंत यांनी काकडे सापडल्यास त्याचा पत्ता बँकेला देण्यासाठी कळवावा, अशी मागणी केली. त्यावर पोलीस निरीक्षक नलवडे यांनी सांगितले की, हा तपासाचा भाग असल्याने बँकेचे लेखी पत्र आल्यास माहिती देता येईल. तसेच परजिल्ह्यातून येऊन वागदेत भाडेकरू म्हणून राहत असल्याने त्याची माहिती पोलीस ठाण्यात देणे आवश्यक होते. यापुढे गावात बाहेरून कोणी भाडेकरू म्हणून राहत असेल, तर त्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

या प्रकरणात सुरेश काकडे एकटाच नसून त्याची पत्नी रुपाली काकडे हिचाही सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे तिलाही सहआरोपी करून त्वरित अटक करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

 

यावर पोलीस निरीक्षक नलवडे यांनी सांगितले की, या प्रकरणात संबंधित सर्व फायनान्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले असून फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळण्यासाठी योग्य ती कारवाई आणि सखोल तपास केला जाईल.

 

या वेळी माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर तसेच वागदे येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.