मैत्री स्पोर्ट्स बांदा, कलेश्वर नेरूर , लिंगरामेश्वर बामणादेवी व वक्रतुंड स्पोर्ट्स तुळसुली वेंगुर्ला संघांमध्ये चुरशीची लढत
वक्रतुंड स्पोर्ट तुळसुली तसेच कलेश्वर नेरुर कॉटर फायनल मध्ये दाखल
स्वप्निल कदम (कुडाळ):
दिनेश वारंग मित्र मंडळ व शिवसेना घावनळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आमदार चषक २०२६’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवार, १२ मार्च रोजी दिवसभर अत्यंत रंगतदार सामने पार पडले. क्रिकेटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि टाळ्यांच्या गजरात मैदानावर चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. मैत्री स्पोर्ट्स बांदा, कलेश्वर नेरूर , लिंगरामेश्वर बामणादेवी व वक्रतुंड स्पोर्ट्स तुळसुली वेंगुर्ला संघांमध्ये चुरशीची लढती झाल्या.या स्पर्धेने परिसरातील क्रीडा वातावरणात मोठी भर घातली असून, प्रत्येक संघाने विजयासाठी कसून झुंज दिली.
आजच्या दिवसातील सामन्यांची सुरुवात सकाळी १० वाजता मैत्री स्पोर्ट्स बांदा व कलेश्वर नेरूर यांच्यातील अटीतटीच्या सामन्याने झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजता लिंगरामेश्वर बामणादेवी व वक्रतुंड स्पोर्ट्स तुळसुली या संघांमध्ये सामना रंगला. दोन्ही सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. दुपारच्या सत्रात खेळाची रंगत अधिकच वाढली. दुपारी १२ वाजता पहिल्या व दुसऱ्या सामन्यातील विजेत्या संघांमध्ये लढत झाली, तर दुपारी १ वाजता या दोन्ही सामन्यांतील पराभूत संघांमध्ये सामना खेळविण्यात आला. त्यानंतर दुपारी २ वाजता तिसऱ्या सामन्यातील पराभूत संघ व चौथ्या सामन्यातील विजेता संघ यांच्यात चुरशीचा सामना झाला.
स्पर्धेच्या नियमानुसार, तिसऱ्या व पाचव्या सामन्यातील विजेते संघ थेट रविवारी होणाऱ्या क्वार्टर फायनल (उपांत्यपूर्व) फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे मैदान मारण्यासाठी सर्वच संघांनी आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. या भव्य आयोजनासाठी दिनेश वारंग मित्र मंडळ, शिवसेना पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. परिसरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामन्यांचा आनंद घेत असून खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत.












