कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरवर लोखंडी चाकूने जीवघेणा हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रकाश शामराव शिंदे याला जिल्हा व सत्र न्यायालय, ओरोस यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, १६ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री प्रकाश शिंदे हा उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेला होता. यावेळी डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने संतापाच्या भरात लोखंडी चाकूने डॉक्टरवर हल्ला केल्याचा आरोप आहे. तसेच डॉक्टरांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी कणकवली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३२, १०९(१), ३५२, ३५१(३), महाराष्ट्र वैद्यकीय सेवा – व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० चे कलम ४ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आरोपीच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय, ओरोस येथे नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अॅड. निकिता म्हापणकर यांनी सविस्तर युक्तिवाद केला. त्यांना अॅड. नितीन म्हापणकर आणि अॅड. कु. शिवानी परब यांनी सहकार्य केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेत जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी आरोपीला न्यायालयाने घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून सशर्त जामीन मंजूर केला. मार्च महिन्यात घडलेल्या या घटनेने वैद्यकीय सेवेत कार्यरत डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकरणात आता आरोपीची न्यायालयीन प्रक्रिया जामिनावर सुरू राहणार आहे.













