दापोली: प्रतिनिधी कोकण किनारपट्टीवर उन्हाचा कडाका वाढत असून आगामी काही दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या वाढत्या उष्णतेपासून पिके आणि पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विशेष कृषी सल्ला जाहीर केला आहे.
हवामान अंदाज: १८ मार्चपर्यंत पाऊस नाही
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात १४ ते १८ मार्च दरम्यान हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही. १४ आणि १५ मार्च रोजी तापमानात वाढ होईल, तर १६ मार्चपासून तापमानात २ ते ३ अंशांनी किंचित घट अपेक्षित आहे. या काळात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९८ टक्के इतकी उच्च राहणार असून पुढील तीन दिवस सकाळी धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंबा व काजू बागांची काळजी
-
सिंचन: फळधारणा झालेल्या आंब्याच्या झाडांना १५ दिवसांच्या अंतराने प्रति झाड १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. मात्र, फळे काढणीस तयार होण्यापूर्वी एक महिना पाणी देणे बंद करावे.
-
फळमाशी नियंत्रण: वाटाणा ते अंडाकृती आकाराच्या आंब्याच्या फळांना कागदी पिशव्यांचे आवरण घालावे. फळमाशीपासून संरक्षणासाठी बागेत प्रति एकरी २ ‘रक्षक सापळे’ लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
रोग नियंत्रण: धुक्यामुळे आंब्यावर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास ०.१% कार्बेन्डाझिमची फवारणी करावी. तसेच फळे तडकण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी बोरॅक्सची फवारणी फायदेशीर ठरेल.
-
काजू: पक्व काजू बी वेचून ३ दिवस उन्हात वाळवावे. नवीन लागवड केलेल्या कलमांना दर ८ दिवसांनी ३० लिटर पाणी द्यावे.
भाजीपाला व इतर पिके
-
कलिंगड: वाढत्या उन्हापासून वाचवण्यासाठी कलिंगडाची फळे भाताच्या पेंढ्याने झाकून ठेवावीत. फळावर ठोकल्यास ‘बद’ असा आवाज आल्यास फळ काढणीस तयार समजावे.
-
भेंडी: तुडतुडे व मावा किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत किंवा शिफारसीनुसार औषधांची फवारणी करावी.
पशुधन व कुक्कुटपालन
वाढत्या उष्णतेमुळे पशुधनास स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी चाऱ्यावर १% गूळ व ०.५% मिठाचे द्रावण शिंपडावे आणि दुपारच्या वेळी जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. कुक्कुटपालन शेडच्या छतावर गवत किंवा नारळाच्या झावळ्यांचे आच्छादन घालून तापमान कमी ठेवावे.
शेवटचा महत्त्वाचा सल्ला म्हणजे उन्हाळ्यामुळे जंगलात वणवा लागण्याची शक्यता असते. आंबा आणि काजू बागांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती ठराविक अंतराने ‘वणवा निरोधक पट्टे’ साफ करावेत, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.













