‘एसएसआय कॉम्प्युटर’ला एमएस-सीआयटी सुपर परफॉर्मिंग सेंटर पुरस्कार

कुडाळमध्ये एमकेसीएलच्या विभागीय मेळाव्यात गौरव; सलग १६ वर्षे यशाची परंपरा कायम

सावंतवाडी । प्रतिनिधी :महाराष्ट्र ज्ञान महामंडळामार्फत (एमकेसीएल) कुडाळ येथे आयोजित विभागीय मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘एसएसआय कॉम्प्युटर सेंटर’ला ‘एमएस-सीआयटी सुपर परफॉर्मिंग सेंटर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. एमकेसीएलचे संचालकीय व्यवस्थापक पांडे यांच्या हस्ते एसएसआय कॉम्प्युटरचे संचालक रघुनाथ तानावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त एमएस-सीआयटी (MS-CIT) तसेच एमकेसीएल व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त ‘के-लिक’च्या (K-LiC) विविध व्यावसायिक संगणक कोर्सेसमध्ये सन २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, २०१० पासून सलग १६ वर्षे एसएसआय कॉम्प्युटर सेंटरला ‘सुपर परफॉर्मिंग सेंटर’ म्हणून बहुमान मिळत असून, संस्थेने आपल्या यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.

ग्रामीण भागात संगणक साक्षरता आणि कौशल्य आधारित शिक्षण पोहोचवण्यात या केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सन २०२५ मध्ये तब्बल ३८७ विद्यार्थ्यांनी एमएस-सीआयटी कोर्ससाठी या केंद्रात प्रवेश घेतला आहे. तांत्रिक सोयीसुविधा आणि दर्जेदार शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा या केंद्राकडे वाढत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला रिजनल लीड सेंटरचे मंगेश जाधव, अतुल पतोडे, अमित रानडे, संतोष कोलते आणि प्रणव तेली आदी मान्यवर उपस्थित होते. एसएसआय कॉम्प्युटर सेंटरने सातत्याने राखलेल्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संचालक रघुनाथ तानावडे व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले.