सावंतवाडीत ‘आपण व्यक्त होऊया!’ चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

धन्विका मुळीक, प्रार्थना नाईक प्रथम

भोसले-तळीकर प्रतिष्ठान व नगरपरिषदेचा उपक्रम

‘सामाजिक बांधिलकी’ संस्थेला सेवा पुरस्कार प्रदान

सावंतवाडी | प्रतिनिधी : स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान, सावंतवाडी नगरपरिषदेचे ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ‘आपण व्यक्त होऊया!’ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे पार पडलेल्या या स्पर्धेत रंगभरण गटात धन्विका सचिन मुळीक, तर चित्रकला गटात प्रार्थना प्रणय नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी स्पर्धेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मात्र, त्यांचा वारसा भोसले-तळीकर प्रतिष्ठान ज्या समर्थपणे पुढे नेत आहे, ही बाब भूषणावह आहे,” असे उद्गार केसरकर यांनी यावेळी काढले.

दोन गटांत झालेल्या या स्पर्धेचा निकाल देण्यात आला. यात

गट १ (इयत्ता पहिली ते दुसरी – रंगभरण):

धन्विका सचिन मुळीक (प्रथम), हर्षिता प्रवीण मुळीक (द्वितीय), स्वराली विश्वेश पांगम (तृतीय). हार्दिक अमोल भिरवंडेकर व दिक्षा पराग टिळवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तर गट २ (इयत्ता तिसरी ते चौथी – चित्रकला) अंतर्गत प्रार्थना प्रणय नाईक (प्रथम), सार्थक स्नेहल मालवणकर (द्वितीय), आराध्या अभिजित चव्हाण (तृतीय). आरोही विनोद गावडे व अन्वी विनोद गावडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. कलाशिक्षक बी. व्ही. मालवणकर व चित्रकार अक्षय सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘स्व. किशोर दत्ताजीराव भोसले स्मृती आरोग्य व सामाजिक सेवा पुरस्कार’ सावंतवाडीतील ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ या संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थेचे सदस्य रवी जाधव, रुपा मुद्राळे, हेलन निब्रे, समीरा खलील आणि लक्ष्मण कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब, प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, ॲड. नकुल पार्सेकर, कोमसाप अध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल भोसले, संचालिका मंगल भोसले, शोभा भोसले, मानसी भोसले, नमिता भोसले व सोमा सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन गौरव भोसले, प्राजक्ता पाटील, सुलक्षणा चव्हाण, शिवम धुरी तसेच ‘आपण व्यक्त होऊया’ समितीच्या सर्वेश राऊळ, अविनाश बांदेकर, समर्थ केळुसकर व सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले, तर आभार समिती प्रमुख निरज भोसले यांनी मानले.