हद्दीवर संरक्षक भिंत उभारा अन्यथा तीव्र आंदोलन
सावंतवाडी । प्रतिनिधी :येथील उपरलकर स्मशानभूमीत असलेल्या लाखे समाजाच्या दफन भूमीच्या दुरवस्थेकडे आणि व्यवस्थापनाकडे नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या अनास्थेमुळे दफन विधी हळूहळू दहनभूमीच्या हद्दीत पोहचले असून, यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास नगरपरिषदेसमोर तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर यांनी दिला आहे. दरम्यान, या जागेत स्वच्छता करून दोन्ही समाजांमधील तेढ टाळण्यासाठी दहनभूमी व दफनभूमीच्या हद्दीवर संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर यांनी केली आहे.
या गंभीर समस्येबाबत माहिती देताना सुधीर पराडकर म्हणाले की, प्रशासकीय राजवटीत आम्ही हा विषय सर्वप्रथम मांडला होता. त्यानंतर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले रजेवर असताना उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचेही याकडे लक्ष वेधले होते. याशिवाय मुख्याधिकारी, नगरसेवक देव्या सुर्याजी आणि नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांची भेट घेऊन त्यांनाही परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यावेळी आरोग्य विभागाकडून हा परिसर लाखे समाजाला स्वच्छ करून देण्याचे आश्वासन मिळाले होते; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
पराडकर यांनी पुढे स्पष्ट केले की, लाखे समाज हा हिंदू असून त्यांच्यात मृतदेहावर दफन संस्कार करण्याची परंपरा आहे. त्यांच्या दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेत सध्या झाडाझुडुपांचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
नगरपरिषदेकडून या जागेची देखभाल व साफसफाई होत नसल्यानेच आज ते दहनभूमीच्या हद्दीत आले आहेत. यात लाखे समाजाची काहीही चूक नसून नगरपरिषदेची अनास्था कारणीभूत आहे. प्रशासनाने या जागेत त्यांची योग्य व्यवस्था करून द्यावी. येत्या काही दिवसांत यावर ठोस कार्यवाही झाली नाही, तर निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेल्या नागरिकांच्या चौपट लोकांना सोबत घेऊन नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पराडकर यांनी दिला आहे.
या संवेदनशील विषयावर बोलताना नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सांगितले की, या समस्येबाबत नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा करून दफन भूमी परिसरातील स्वच्छता तात्काळ करून घेतली जाईल. भविष्यात दोन समाजात कोणताही वाद किंवा तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घेत प्रशासनाने दहनभूमी आणि दफन भूमीच्या हद्दीवर तातडीने संरक्षक भिंत उभारणे आवश्यक आहे.
यासोबतच स्मशानभूमीच्या तुटलेल्या दरवाजाची दुरुस्ती करण्यात यावी आणि समोरील भागात असणाऱ्या गवळी समाजाच्या स्मशानभूमीचा दरवाजा सुस्थितीत आणून ती जागा बंदिस्त करावी; जेणेकरून रात्रीच्या वेळी काही युवकांकडून त्या भागात चालणारी गैरकृत्ये व टवाळखोरी बंद होईल, असे मतही नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केले.












