लांजा बाजारपेठेतील दोन हातगाडी व्यवसायिकांचे गॅस सिलिंडर चोरी शनिवारी मध्यरात्रीची घटना

लांजा (प्रतिनिधी): लांजा बाजारपेठेतील दोन हातगाडी व्यवसायिकांचे गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.‌. एकीकडे गॅस सिलिंडरची टंचाई असताना दुसरीकडे मात्र ऐन टंचाईवेळी चोरी झाल्याने संबंधित व्यवसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांजा बाजारपेठेमधील दोन हातगाडीवर व्यवसायिकांच्या गाड्यांवर असलेले गॅस सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केले. यामध्ये चोरी झालेल्या एका व्यवसायिकाची हातगाडी भूमी अभिलेख कार्यालयासमोर असते, तर दुसऱ्या व्यवसायिकाची हातगाडी साई लॉज समोर असते.

रविवारी सकाळी संबंधित व्यवसायिक आपल्या हातगाडीकडे आले असता गॅस सिलिंडर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सद्धया गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असतानाच ही चोरी झाल्याने लांजातील इतर हातगाडी व्यवसायिकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, लांजा शहरातील बाजारपेठ परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या सिलिंडर चोरीच्या या घटनेमुळे संबंधित व्यवसायिक अडचणीत आले असून गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नवीन सिलेंडर चोरटे उद्यास आल्याची एकच चर्चा संपूर्ण लांजा शहरात रंगली आहे.