
आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रीकसीनयुक्त दशावतार नाट्य महोत्सवाचे उद्घाटन
संजू परब मित्रमंडळाचे आयोजन
वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक गुरू मठकर यांच्यावतीने ५० सायकलींचे वाटप
सावंतवाडी । प्रतिनिधी : मी आज जो काही आमदार आहे आणि विधिमंडळात जनतेचा आवाज उठवू शकत आहे, ते केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासामुळे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कोकणावर जे अपार प्रेम केले, त्या प्रेमाखातर कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून मी काम करत आहे. खासदार नारायण राणे यांनी आयुष्यभर कोकणच्या विकासाचा ध्यास घेतला, तोच वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे, असा विश्वास शिवसेना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्र मंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी येथे ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केक कापून आ. निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपत गुरू मठकर यांच्या वतीने ५० सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. निता कविटकर-सावंत, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जि. प. सदस्य सुदन कवठणकर, माजी सभापती अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उप जिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस, युवासेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडिस, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, सौ. संजना परब, दयानंद परब, राकेश पवार, परिक्षित मांजरेकर, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.
*संजू परब व त्यांच्या सहकाऱ्यांची नेहमीच समर्थ साथ*
संजू परब आणि त्यांच्या मित्रमंडळाने नेहमीच माझ्या सुख-दुःखात साथ दिली आहे. राजकारणात अनेक चढ-उतार येतात, पण माझ्या कार्यकर्त्यांनी मला देवासारखी साथ दिली. संजू परब तर गेली १७ वर्षे नियमितपणे माझा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचे व माझे संबंध हे अत्यंत जिवाभावाचे आहेत व ते जीवात जीव असेपर्यंत राहतील, असे भावोद्गार आ. निलेश राणे यांनी काढले.
ते म्हणाले, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवताना दत्ता सामंत यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची साथ मिळाली. कोकणच्या विकासासाठी मी कणभर जरी योगदान देऊ शकलो, तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. विधिमंडळात काम करताना आमदार दीपक केसरकर यांचे मार्गदर्शन नेहमीच आधारवड ठरते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
*आ. निलेश राणे यांचे विधिमंडळातील कामकाज धडाकेबाज : आ. दीपक केसरकर*
आमदार दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, निलेश राणे यांनी खासदार म्हणून यापूर्वी उत्तम काम केले आहेच, पण आता आमदार म्हणूनही ते विधिमंडळात आणि मतदारसंघात धडाकेबाज कामगिरी करत आहेत. यापूढेही कोकणची सेवा करण्याची मोठी संधी त्यांना भविष्यातही मिळत राहो, अशा शब्दांत आ. दीपक केसरकर यांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या.
ते म्हणाले, अतिशय तरुण वयामध्ये निलेश राणे यांच्यावर खासदारकीची मोठी जबाबदारी आली होती आणि त्यांनी ती उत्कृष्टपणे पेलली. महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि कार्यक्षम खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. मध्यंतरीच्या दहा वर्षांच्या काळानंतर आता त्यांना पुन्हा एकदा योग्य वेळी योग्य संधी मिळाली असून या संधीचे सोने करून त्यांनी कोकणच्या भूमीची सेवा करावी. ते पुढे म्हणाले, नारायण राणेंनी जो विकासाचा वारसा दिला आहे, तोच वारसा पुढे नेत निलेश राणे यांनी जनतेसाठी मोठे काम करावे आणि भविष्यात कोकणचे यशस्वी प्रतिनिधित्व करावे, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
*माझ्या राजकीय जडणघडणीत निलेश राणे यांचा सिंहाचा वाटा – संजू परब*
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी निलेश राणे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या १७ वर्षांपासून आम्ही आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. ते वरून कठोर वाटत असले तरी फणसासारखे आतून गोड आहेत. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील तरुण पिढी त्यांच्या नेतृत्वावर भरभरून प्रेम करत आहे,” असे परब यांनी सांगितले. यावेळी दत्ता सामंत यांनीही निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. आमदार झाल्यानंतर जिल्ह्याच्या प्रश्नावर त्यांनी ज्या पद्धतीने विधीमंडळात रान उठवले, ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाढदिवसानिमित्त आयोजित दशावतार नाट्यमहोत्सवाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच सायकल वाटप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या सोहळ्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते संजू परब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नाट्यप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













