तळवडेतील रुपीनगर परिसरात दुपारी आग; मोठे नुकसान
अग्निशमन दलाची तत्पर कारवाई; सुदैवाने जीवितहानी टळली
पिंपरी-चिंचवडमधील तळवडे परिसरात भीषण आग लागून गोदाम, कपड्यांचे दुकान आणि एक बस जळून खाक झाली. ही घटना रविवारी दुपारी घडली असून अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून तपास सुरू आहे.
पुणे : तळवडे येथील रुपीनगर परिसरातील एका गोदामाजवळ रविवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत भंगाराचे गोदाम, शेजारील कपड्यांचे दुकान आणि एक नवीन बस पूर्णपणे जळून खाक झाली.
पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत अवघ्या एका तासात आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी दुपारी सुमारे 2 वाजता आगीची माहिती मिळताच 7 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले, मात्र पूर्णपणे आग विझवण्यासाठी अधिक वेळ लागला.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत तपास सुरू आहे. या आगीत संपूर्ण गोदाम आणि शेजारील कपड्यांचे दुकान जळून खाक झाले.
गोदामाजवळ उभी असलेली एक नवीन बसही आगीत पूर्णपणे नष्ट झाली. संबंधित मालकाने ही बस केवळ आठ दिवसांपूर्वीच खरेदी केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.











