राजापुरात गुढीपाडव्यानिमित्त भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे’ आयोजन; पारंपारिक वेशात सहभागी होण्याचे आवाहन

राजापूर (वार्ताहर): गुरूवार दि. १९ मार्च रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून राजापूर शहरात भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, राजापूर’ आणि ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ही शोभायात्रा गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथून प्रारंभ होईल. या शोभायात्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
आयोजकांनी सर्व हिंदू बांधव, भगिनी, सांस्कृतिक मंडळे, भजन मंडळे आणि महिला मंडळांना या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा करून आणि मस्तकी टिळा लावून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती’ने केले आहे.
या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हिंदू कालगणनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. इंग्रजी कालखंडानुसार आपण २०२६ व्या वर्षात पदार्पण करत असताना, हिंदू काल गणनेनुसार हे १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, १६ कोटी, ८ लक्ष, ५३ सहस्त्र, १२८ वे वर्ष असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘हिंदू धर्माचे आचरण आणि संवर्धन हेच हिंदुत्व’ हा विचार या शोभायात्रेच्या केंद्रस्थानी असेल.
राजापूरमधील हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडावा, यासाठी समितीचे कार्यकर्ते जय्यत तयारी करत आहेत. या स्वागत यात्रेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.