खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील दुर्गम भागातील साखरोळी मोरेवाडी जिल्हा परिषद शाळेने शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. या शाळेतील विद्यार्थी प्रणय प्रशांत कांबळे याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ९३.५० टक्के गुण मिळवत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
१९४८ साली स्थापन झालेल्या या शाळेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्यामुळे प्रणय कांबळे याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. दुर्गम भागातील शाळा असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आदर्श या यशातून पुढे आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. शिष्यवृत्ती मार्गदर्शक राजेश भागणे, मुख्याध्यापक अनिल यादव तसेच शिक्षक अमोल सकपाळ आणि कृष्णा गंभीरे यांनी प्रणयला सातत्याने मार्गदर्शन करत त्याची तयारी भक्कम केली. त्यांच्या अथक परिश्रमांचे हे फळ मानले जात आहे.
‘व्हिजन खेड’ या उपक्रमांतर्गत खेडचे गटशिक्षणाधिकारी तसेच विस्तार अधिकारी विजय बाईत यांनीही साखरोळी मोरेवाडी शाळेकडे विशेष लक्ष देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रणय कांबळे याने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले असून त्याला जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे प्रवेश मिळाला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोरे, सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि पालकांनी प्रणय कांबळे तसेच त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.










