देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील खाकशी तिठा येथील समर्थ एंटरप्रायझेस हार्डवेअर दुकानातील ३६ हजार रूपये किंमतीचे एकूण ६ लोखंडी स्टॅण्ड चोरी करून तसेच लोखंडी स्टॅण्डला उभे करून ठेवलेले ग्रॅनाईट मार्बल दुकानातील जमिनीवर पाडून सुमारे २५ हजाराचे नुकसान केल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. ते १६ मार्च रोजी सकाळी ८.३० वा. च्या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे येथील श्रीशैल बिल्डिंग येथे वास्तव्यास असणारे राज सिताराम मोरजकर (४५) यांचे खाकशी तिठा येथे समर्थ एंटरप्रायझेस हार्डवेअर दुकान आहे. १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या दुकानाच्या बाहेर उभे करून ठेवलेले ग नाईट मार्बल जमिनीवर पाडून सुमारे २५ हजार रूपयांचे नुकसान केले. तसेच ग्रॅनाईट मार्बल उभे करून ठेवण्यासाठीचे काळ्या रंगाचे एकूण सहा लोखंडी स्टॅण्ड चोरून नेले. या स्टॅण्डची किंमत प्रत्येकी ६ हजार रूपये असून एकूण ३६ हजाराचे मुद्देमाल चोरीस गेला असल्याची फिर्याद राज मोरजकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.












