दापोली (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त दोन दिवसीय भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते द्वितीया, शके १९७८ ‘पराभव’ नाम संवत्सरानुसार गुरुवार दि. १९ मार्च २०२६ व शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
मठाचे संस्थापक वैभव विजय जोशी यांनी भाविकांना आवाहन करताना सांगितले की, या पवित्र सोहळ्यात सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार तसेच मित्रमंडळींसह सहभागी होऊन श्रींचे दर्शन, महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार दि. १९ मार्च रोजी पहाटे ६.३० ते ७.०० या वेळेत श्रींची पूजा होणार असून त्यानंतर सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. वेदमूर्ती अनिरुद्ध पेंडसे व सहकारी यांच्याकडून हे पारायण पार पडणार आहे. रात्री ९.०० नंतर श्रींची आरती व मंत्रपुष्पाने दिवसाची सांगता होईल.
शुक्रवार दि. २० मार्च रोजी श्री स्वामी जयंती निमित्त विविध धार्मिक विधींचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत श्रींच्या पादुकांची पूजा व लघुरुद्र विधी वेदमूर्ती रामेश्वर परांजपे व सहकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर दुपारी १०.३० ते १२.३० या वेळेत होमहवनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी विशेष कार्यक्रम म्हणून दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत आंजर्ले येथील श्री दुर्गादेवी महिला भजन मंडळाकडून भजन सादर केले जाणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता श्रींची आरती व मंत्रपुष्प होईल, तर रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत श्री देविदास दातार व सहकारी यांची संगीत सेवा रंगणार आहे.
या कार्यक्रमाला विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
आसूद परिसरात या उत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्तरावर सर्व तयारी पूर्ण झाली असून उत्सव यशस्वी करण्यासाठी मठ व्यवस्थापन प्रयत्नशील आहेत.













