रत्नागिरी:
विद्यार्थी दशेतच संसदीय आणि विधिमंडळाच्या कामकाजाची ओळख व्हावी, या उदात्त हेतूने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय युवा संसदेत’ रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. जान्हवी जोशी हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावून देदीप्यमान यश संपादन केले आहे. युवक बिरादरी (भारत) या १९७४ मध्ये क्रांती शहा यांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर आधारलेली ही संस्था देशभरात लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी विविध उपक्रम राबवते.
या यशाचा प्रवास जानेवारी २०२६ मध्ये महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेतून सुरू झाला. या कार्यशाळेत युवक बिरादरीचे कार्यकारी समन्वयक ॲड. वेदांत माईणकर आणि संचालक प्रा. नागेंद्र राय यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राजकीय व्यवस्था आणि संसदीय कामकाजाचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक शिक्षण दिले. याच वेळी झालेल्या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेतून तृतीय वर्ष कला शाखेतील कु. ओंकार आठवले आणि कु. जान्हवी जोशी यांची पुढील फेरीसाठी निवड झाली होती. या दोन्ही विजेत्यांना प्रारंभी पाच हजार रुपयांच्या धनादेशाने सन्मानित करण्यात आले होते.
प्राथमिक फेऱ्यांच्या खडतर प्रवासानंतर, संपूर्ण देशातील सुमारे दोन हजार स्पर्धकांमधून जान्हवी जोशीची निवड अंतिम २८ स्पर्धकांमध्ये झाली. गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी मुंबईत पार पडलेल्या या अंतिम राष्ट्रीय अभिरूप युवा संसदेत ‘सत्ता समतोल: केंद्र-राज्य संबंधांवर पुनर्विचार’ आणि ‘कर्तव्य विधेयक- २०२६’ यांसारख्या अत्यंत कठीण आणि समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारमंथन केले. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. साधना गोरे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, प्रा. हुबनाथ पांडे, डॉ. मृदुल निळे आणि राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त श्री. अविनाश सणस यांसारख्या दिग्गज मान्यवरांनी केले. याप्रसंगी तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे उपसंचालक श्री. विल्यम जे. एस. वांग यांचीही विशेष उपस्थिती होती.
अंतिम निकालात पंजाबमधील दिव्या मेनन यांनी प्रथम, तर महाराष्ट्राच्या सर्वेश नायक यांनी द्वितीय आणि मधू सिंग यांनी तृतीय क्रमांक पटकावला. जान्हवी जोशीला तिच्या प्रभावी सादरीकरणासाठी १० हजार रुपये रोख, प्रवासखर्च आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई व डॉ. कल्पना आठल्ये यांनी तिचे कौतुक केले आहे. या यशात तिला डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. दत्तात्रय कांबळे, प्रा. नीलेश पाटील, डॉ. पंकज घाटे, प्रा. मधुरा चव्हाण या शिक्षकांसह मनस्वी नाटेकर, मनस्वी बोरीकर आणि ओंकार आठवले या सहाध्यायांचे मोलाचे सहकार्य लाभले.













