स्वर्गीय पत्नीच्या स्मरणार्थ २० हजारांची देणगी
शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील उंडील नं. १ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेस माजी विद्यार्थी श्री. पांडुरंग वामन यादव यांनी त्यांच्या स्वर्गीय पत्नी कै. संगीता पांडुरंग यादव यांच्या स्मरणार्थ २०,००० रुपयांची देणगी धनादेशाद्वारे प्रदान केली.
या निमित्ताने शाळेत आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सदर देणगी सुपूर्द करण्यात आली. यावेळी श्री. यादव यांनी आपल्या पत्नीच्या स्मृती जतन करण्याबरोबरच शाळेच्या प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने ही देणगी दिल्याचे सांगितले. त्यांच्या या भावपूर्ण उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
शाळेच्या वतीने देणगीदारांचा सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. प्राप्त झालेली देणगी शाळेतील शैक्षणिक सुविधा व आवश्यक विकासकामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कृष्णाजी नर, शिक्षणतज्ञ श्री. दिलीप काळे, या प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती शेलुकर,पदवीधर शिक्षक श्री. अनिल नेरकर, अंगणवाडी सेविका सौ. पार्वती नर तसेच ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक श्री. अनिल पाटील यांनी केले.
फोटो कॅप्शन :उंडील येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उंडील १ या शाळेस माजी विद्यार्थी श्री. पांडुरंग वामन यादव यांनी त्यांच्या स्वर्गीय पत्नी कै. संगीता पांडुरंग यादव यांच्या स्मरणार्थ २० हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे प्रदान केली.












