रोजगारावर भर देणार : जाहिरनाम्याचे प्रकाशन
सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘अनुभव माणसाला सुयोग्य बनवतो’ या तत्त्वानुसार, आपल्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर मी सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून, शहरातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच येथील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून देणे हे माझे प्रमुख लक्ष्य आहे, अशी माहिती सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगांवकर यांनी दिली. त्यांनी यावेळी आपला जाहिरनामा प्रकाशित केला. यावेळी त्यांच्यासोबत ऐश्वर्या कोरगांवकर उपस्थित होत्या.
त्या म्हणाल्या, माजी उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्षपदाचा अनुभव माझ्या गाठीशी असून येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले.
“अनुभव, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद हेच माझे बळ आहे,” असे त्यांनी जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले. यापूर्वी उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना अनेक विकासकामे मार्गी लावल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीच्या रिंगणात खंबीरपणे उतरलेल्या कोरगांवकर यांनी मतदारांना आवाहन केले की, मी निवडणूक लढवत आहे आणि माघार घेणार नाही. जर कोणी तसा मेसेज देत असेल, तर तो खरा मानू नये. मेणबत्ती सर्वांनी पेटवून शहराला अधिक प्रकाशमय करुया, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
त्यांनी मतदारांना आश्वासित केले की, मी केवळ आश्वासन देणारी नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवणारी उमेदवार आहे. सावंतवाडीला अधिक सक्षम, स्वच्छ आणि रोजगारक्षम शहर बनविणे हेच आपले अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.












