तीन दिवसीय सुरंगी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले | दाजी नाईक : सुरंगी महोत्सव हा निसर्ग, संस्कृती आणि उद्योजकता यांचा सुंदर संगम ठरला असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास वेंगुर्ले महाविध्यालायाचे प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी व्यक्त केला. कोकणातील जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला सुरंगी महोत्सव २०२६ उत्साहात पार पडला.
आसोली येथे सुरंगी महोत्सव बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला येथील इको-टुरिझम सर्टिफिकेट कोर्स, रसायनशास्त्र विभाग, ग्रामीण विकास विभाग, महिला विकास कक्ष तसेच इंडियन वुमन सायंटिस्ट्स असोसिएशन (IWSA), सखी महिला संघ, आसोली आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आसोली येथील शेतवाडा होमस्टे तसेच बापुळीवाडी येथील सुरंगीच्या राईला भेट देण्यात आली. यावेळी सहभागींस सुरंगीच्या नैसर्गिक अधिवासाची आणि कोकणातील जैवविविधतेची सविस्तर माहिती देण्यात आली. दुपारी पारंपरिक कोकणी जेवणाचा आस्वाद देण्यात आला. यानंतर आसोली महिला संघ केंद्र येथे सुरंगी महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात स्वागत व प्रास्ताविक डॉ. धनश्री पाटील यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, पाहुणे, आयोजक संस्था व सहभागींचे मनःपूर्वक स्वागतकरत महोत्सवाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. ग्रामीण महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे आणि पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. . तसेच सुरंगी महोत्सवाच्या अध्यक्षीय भाषणात सौ. रिया धुरी यांनी ग्रामीण महिलांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पारंपरिक ज्ञान यांचा योग्य वापर करून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची नवी दारे उघडता येतील. सुरंगी फुलांपासून सुगंधी तेल निर्मिती हा उपक्रम केवळ आर्थिक संधी निर्माण करणारा नाही तर पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देणारा आहे, असे त्यांनी नमूद केले. डॉ. मंजुश्री देवधर त्यांनी सुरंगी फुलांचे औषधी, सौंदर्यवर्धक आणि सुगंधी गुणधर्म स्पष्ट करत त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण महिलांना या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून लघुउद्योग उभारण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. डॉ. देवधर यांनी सुगंधी तेल निर्मिती प्रक्रियेतील वैज्ञानिक पैलू, स्थानिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि पर्यावरणपूरक उद्योगांची गरज यावर भर दिला. त्यांनी सहभागींस प्रत्यक्ष प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे प्रोत्साहन दिले.
सुरंगी महोत्सवाच्या समारोप सत्रात सुर्यकांत गोलंम यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती विवेकर यांनी उत्साहपूर्ण पद्धतीने केले कार्यक्रमाप्रसंगी गोवा जैवविविधता मंडळाच्या रेश्मा केरकर, कोकण भरारी महिला शेतकरी उत्पादक कंपनी ची अध्यक्ष श्वेता चेंदवणकर, सुरेखा धुरी, संदीप तांडेल, राम चव्हाण, गोपाल कोर्गावणकर, सौरभ आयरे, शिवकन्या तोडकर यांची उपस्थिती लाभली
दुसऱ्या दिवशी सुरंगीच्या फुलांपासून सुगंधी तेल काढण्याची प्रक्रिया बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज मधील वनस्पतीशास्त्र विभागात प्रत्यक्ष दाखवण्यात आली. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीद्वारे सुगंधी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे स्थानिक साधनसंपत्तीचा उपयोग करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या संधींबाबत डॉ. नरेंद्र शर्मा यांनी माहिती दिली. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांसाठी लघुउद्योगाच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक उद्योग आणि इको-टुरिझमला चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.








