विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुदृढतेची जाणीव निर्माण करण्याचा उपक्रम
शिरगाव (प्रतिनिधी) :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या क्षेत्रीय प्रकल्पाच्या अनुषंगाने शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव येथे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘सूर्यनमस्कार व शारीरिक सुदृढता’ या विषयावर १५ दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नियमित व्यायामाची सवय लागावी व त्यांची शारीरिक सुदृढता वाढावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. हे शिबिर डॉ. सौ. रेखा राजेंद्र पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ मार्च २०२६ पासून सुरू झाले असून दि. २८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. शिबिरात सध्या सुमारे ५० विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांना योगासने व सूर्यनमस्कार यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे.
या उपक्रमासाठी शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच संस्थेच्या चालकांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सौ. रेखा पारकर यांचे आभार मानण्यात आले.










