आमदार निलेश राणे यांच्या मतदार संघातील मालवण पंचायत समिती राज्यात आदर्श ठरावी : जिल्हापरिषद उपाध्यक्ष दादा साईल

मालवण पंचायत समितीच्या कामकाजाचा घेतला आढावा

गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या चांगल्या कामाचे कौतुक

मालवण | प्रतिनिधी : प्रत्येक अधिवेशनात जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडवण्याचे काम सातत्याने आमदार निलेश राणे करत आहेत. राज्यात आदर्श ठरावे असे काम आमदार निलेश राणे करत आहेत. त्यांच्या मतदार संघातील मालवण पंचायत समिती राज्यात आदर्श ठरली पाहिजे असे काम आपण सर्वांनी करूया. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी मालवण पंचायत समिती येथे बोलताना केले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी सोमवारी सकाळी मालवण पंचायत समितीला भेट दिली. छत्रपती संभाजी राजे सभागृहात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सभापती प्रज्ञा चव्हण, उपसभापती घनश्याम झाड, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर दीपक सुर्वे, माधुरी मसुरकर, दादा नाईक यांसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत स्थानिक विकास कार्यक्रम आमदार, खासदार निधी अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची प्रगती तपासण्यात आली.

जनसुविधा व नागरी सुविधा योजना 2024-25 अंतर्गत मूलभूत सुविधांची उपलब्धता, कामांची गुणवत्ता व वेळेत पूर्तता यावर विशेष भर देण्यात आला.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या साहित्याचा आढावा घेऊन लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचत असल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच भजन साहित्य व इतर वैयक्तिक लाभ योजनांच्या पारदर्शक अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच शाळा दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावणे, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढवून प्रत्येक गावात नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याबाबत निर्देश देण्यात आले. सदर बैठकीत सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करत शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे व वेळेत पोहोचवाव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

जिल्हा परिषद विश्रामगृह, मालवण तसेच गटविकास अधिकारी कॉटर्सची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान इमारतींची एकूण स्थिती, स्वच्छता, पाणी व वीज पुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती व देखभाल कामे तात्काळ हाती घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. शासकीय विश्रामगृह व निवासस्थाने सुस्थितीत राहून अधिकारी व नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नियमित देखभाल व सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांचे कौतुक

मालवण पंचायत समितीचे काम चांगले आहे. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी कर्मचारी चांगले काम करत आहेत. गटशिक्षणाधिकारी संजय माने व शिक्षण विभागाचे ही काम राज्यात आदर्श ठरावे असे आहे. एकूणच यशवंत पंचायत राज अभियानात चांगली कामगिरी करून मालवण पंचायत समितीने राज्यस्तरावर पोहचावे. अशाही शुभेच्छा दादा साईल यांनी दिल्या.

मालवण तालुका जिल्ह्याचे हृदय

सिंधुदुर्ग जिल्हा हा आदर्श जिल्हा आहे. तर मालवण तालुका हा जिल्ह्याचे हृदय आहे. जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग पर्यटनाच्या माध्यमातून जाणार आहे. त्यामुळे मालवण तालुका अतिशय महत्वाचा आहे. त्यासोबत देवगड, वेंगुर्ला हे किनारपट्टी तालुके अतिशय महत्वाची जबाबदारी बजावणार आहेत. आपण सर्वांनी कटीबद्ध राहून काम करूया. असेही दादा साईल यांनी सांगितले.