पुस्तकातील लोकशाही आता डोळ्यांसमोर!

दापोलीतील विद्यार्थ्यांची विधान भवनाला भेट; ना. योगेश कदम यांनी घेतली मतदारसंघातील विद्यार्थ्यांची भेट 

दापोली | प्रतिनिधी : जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “व्हिजन दापोली” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय “मुंबई अभ्यास दौरा” आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये दापोली तालुक्यातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत मुंबई येथील विधान भवनाला शैक्षणिक भेट दिली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विधानसभा व विधानपरिषदेच्या विद्यार्थी गॅलरीतून प्रत्यक्ष विधिमंडळाचे कामकाज पाहण्याची अनोखी संधी मिळाली. विधिमंडळात चालणारी चर्चा, प्रश्नोत्तरांची प्रक्रिया, निर्णय घेण्याची पद्धत यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यामुळे पुस्तकातील ज्ञानासोबतच व्यवहारातील लोकशाही व्यवस्थेची ओळख विद्यार्थ्यांना झाली.
या प्रसंगी आमदार योगेशदादा कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विधिमंडळाची रचना, कामकाजाची पद्धत, कायदे निर्मितीची प्रक्रिया तसेच जनतेच्या प्रश्नांवर कशाप्रकारे चर्चा केली जाते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून या प्रक्रियेबाबत उत्सुकता व्यक्त केली.

लोकशाही व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या विधिमंडळाचे कार्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे. अशा अभ्यास दौर्‍यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव दृढ होत असून भविष्यात जबाबदार व सजग नागरिक घडविण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून शिक्षक व प्रशासनाच्या सहकार्यामुळे दौरा यशस्वीरीत्या पार पडला.