नगरपंचायतीच्या बेजबाबदारपणाचा वाचला पाढा
संतोष कोत्रे : लांजा : मंगळवारच्या आठवडा बाजारात बेशिस्तपणे बसणारे भाजी, फळ व अन्य विक्रेते, मोकाट गरे व त्यातून निर्माण होणारी गंभीर परिस्थिती या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी लांजातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपंचायतीच्या नावाने शिमगा केला. यावेळी आलेल्या नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील या नागरिकांनी चांगला जाब विचारला.

लांजा शहरात मंगळवारी आठवडा बाजार भरतो. सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून या पुलाखालीच व्यापारी पसारा मांडून बसतात. मात्र मंगळवारच्या दिवशी हेच व्यापारी सर्व जागा अडवून ठेवत असल्याने बाजारात येणाऱ्या नागरिकांना रिक्षा व्यावसायिक व अन्य व्यावसायिकांना पलीकडे जाणेदेखील कठीण होऊन बसते. हे भाजी , फळ व अन्य विक्रेते ब्रिज खालील सर्व जागा व्यापून टाकत असल्याने ये जा करण्यास मोठी अडचण होते. प्रत्येक आठवडा बाजारच्या दिवशी ही परिस्थिती निर्माण होत असते मात्र त्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
त्याचप्रमाणे मंगळवारच्या आठवडा बाजारच्या दिवशी मोकाट गुरांचा देखील मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असतो. या गुरांमुळे अनेकदा अपघात होत असतात. काही नागरिक देखील यामुळे पडून जखमी झाले आहेत. अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असताना त्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आज लांजातील नागरिक बाबा धावणे, सचिन लिंगायत, बाबू गुरव, आदींसह अन्य नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपंचायतीच्या नावानं शिमगा केला. जर नगरपंचायत व्यापारी वर्गाकडून कर पावती घेते तर त्यांना शिस्त का लावत नाही? मधून जाण्यासाठी रस्ता सोडण्याबाबत का कार्यवाही होत नाही? असं जोरदार सवाल त्यांनी उपस्थित करताच थेट नगरपंचायतीचा कारभाराचे वाभाडे काढले.
नागरिकांच्या या आक्रमक भूमिके नंतर नगरपंचायतीचे काही अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी नागरिकांनी त्यांना उद्भवणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांनी नागरिकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिथून काढता पाय घेतल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी अशाप्रकारे लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असतील तर या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. प्रसंगी मोकाट गुरे घेऊन नगरपंचायतीवर धडक देण्याचा इशारा देखील या नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.












