वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत बीले भरु नका

 

कनेक्शन तोडणार नाही

मडुरेत महावितरण विरोधातील उपोषणात सहाय्यक अभियंत्यांचे आश्चर्यकारक लेखी आश्वासन

बांदा : प्रविण परब :     गेले दोन महिने वीजेच्या खेळखंडोबाने त्रस्त मडुरा पंचक्रोशीतील ग्राहकांनी आज मडुरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर महावितरण विरोधात उपोषण केले. संतप्त ग्राहकांची मनधरणी करताना बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांची भंबेरी उडाली. अखेर १० दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास एकाही ग्राहकांनी वीज बीले भरु नका. थकित बीलांसाठी वीज तोडणी करणार नाही असे आश्चर्यकारक लेखी आश्वासन दिले. दहा दिवसात पूर्तता न झाल्यास कोणतीही नोटीस न देता परत उपोषण छेडण्याचा इशारा उपोषणकर्ते प्रकाश वालावलकर, दिनेश नाईक व संदिप परब यांनी यावेळी दिला.

      मडुरा गावात गेली दोन महिने वीजेचा लपंडाव सुरु आहे. गावातील नळपाणीपुरवठा तब्बल २० दिवस बंद आहेत. भर पावसाळ्यात महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी महावितरण विरोधात उपोषण छेडले.

      सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. मागच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची काय पूर्तता केली ? या प्रश्नावर अभियंता यादव निरुत्तर झाले. संतप्त वीज ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. वीजपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय बीले भरणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. येत्या १० दिवसात मडुरा, रोणापाल, सातोसे, कास, निगुडे गावातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. अन्यथा आपण बीले बरु नका. थकित बिलांमुळे वीज कनेक्शन तोडणी होणार नाही असे आश्चर्यकारक लेखी आश्वासन दिले व आपली सुटका करुन घेतली.

      यावेळी प्रकाश वालावलकर, दिनेश नाईक, संदीप परब, सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, सातोसे माजी सरपंच वसंत धुरी, भाऊसाहेब देसाई, जगन्नाथ पंडीत, रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, नकुळ परब, विद्या धारगळकर, प्रविण नाईक, प्रितेश गवंडी, रामा परब, रामचंद्र सावळ, दिपक राऊळ, गोट्या परब, संतोष परब, कौशल नाईक, सुरेश धुरी, मोहन गवस, विवेक मडुरकर, शुभम नाईक, उल्हास वालावलकर, विजय वालावलकर, आपा खर्डे, अरुण पंडीत, बबलो खर्डे, विश्वजित परब, रुपेश साळगावकर, पंढरी सातार्डेकर, आनंद केरकर, संजय मेस्त्री, पोलीस पाटील नितीन नाईक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.