कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही

राजापूर पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत सदस्यांचा ईशारा

राजापूर (वार्ताहर): शासन आणि प्रशासन ही तालुक्याच्या विकास रथाची दोन चाके आहेत. या रथाचा समतोल राखण्यासाठी अधिकाऱ्यानी लोकहिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यापुढे कामात कोणताही खोडसाळपणा, कामचुकारपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा कडक ईशारा नवनिर्वाचित सदस्यांनी राजापूर तालुका पंचायत समितीच्या पहिल्याच मासिक सभेत दिला. सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर झालेली ही लोकप्रतिनिधींची पहिलीच बैठक असल्याने तालुक्याचे लक्ष याकडे लागून राहिले होते.
सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ‘किसान भवन’ येथे ही बैठक पार पडली. यावेळी उपसभापती अभिजीत गुरव, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांसह सर्व नवनिर्वाचित सदस्य व विविध खात्याचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेताना पुढील बैठकीपुर्वी आपापल्या विभागातील प्रलंबीत कामे पुर्ण करून पुढील बैठकीत आढावा देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. तर चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचे ठरावही या बैठकीत करण्यात आले. विकास कामांचा आढावा आणि कामांची पुर्तता असा समतोल साधत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली.
दिवंगताना श्रध्दांजली वाहून सभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला. प्रास्ताविक सभापती कदम यांनी करून मासिक सभेला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यानी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे नमूद करत अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून कामांत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. शासन म्हणून सर्वतोपरी सहकार्य आमच्याकडून केले जाईल मात्र प्रशासन म्हणून सर्वांनी गांभिर्याने काम करणे अपेक्षीत असल्याचे नमूद केले.
त्यानंतर सदस्य प्रसाद मोहरकर यांनी तालुका पंचायत समिती स्तरापासून केंद्रस्तरापर्यंतच्या सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याचबरोबर आमदार किरण सामंत यांनी ग्रामिण रूग्णालयाच्या रक्त साठवण केंद्रासाठी ६३ लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याचबरोबर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.
त्यानंतर गटविकास अधिकारी म्हेत्रे यानी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यावर चर्चा होवून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यानंतर विभागावर कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सुरूवातीला शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले यांनी आढावा मांडला. त्यानी शाळा दुरूस्ती, रिक्त पदे आणि शिक्षक समयोजनाचा आढावा दिला. धोकादायक वर्गखोल्यांची पावसाळयापुर्वी दुरूस्ती करण्यात यावी, त्या त्या विभागातील शाळा व शिक्षण विषयक प्रश्न सोडविण्यासाठी एक बैठक घ्यावी. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शिक्षक समायोजनात शिक्षकांची सोय न पाहता विद्यार्थ्यांची सोय बघीतली जावी अशा सूचना मांडण्यात आल्या.
त्यानंतर डॉ. कोकरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा मांडला. आरोग्य विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करताना शासनाच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोहचविल्या गेल्या पाहिजे. आरोग्य विमाचा लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना विमा कार्ड वितरीत करावी अशा सूचना करण्यात आल्या. एसटी विभागाच्या आढाव्यात अचानक रद्द केल्या जाणाऱ्या फेऱ्यांमुळे तसेच वेळेवर एसटी बसेस सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे प्रश्न सदस्यांतून उपस्थित करण्यात आले. त्यावर श्री. झोरे यांनी पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर केली जाईल असे सांगितले.
कृषी विभागाच्या आढाव्यात शासनाच्या विविध कृषी योजना शेतकऱ्यांना माहित नसून त्या गावा गावात जावून सांगितल्या जाव्यात. शेतकऱ्यांना आंबा काजू नुकसानीचा आढावा घेवून शासनाकडून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना करण्यात आल्या. तर महावितरण विभागाच्या आढाव्यात वर्षोनुवर्षे गंजलेले पोल, विद्युत वाहिन्या बदण्यात यावेत तसेच पावसाळयात विज खंडीत होत असल्याने पावसाळयापुर्वी विजवाहिन्यांवरील झाडी तोडण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या.
गावागावातील रस्त्यांच्या दुरूवस्थेचे पडसाद या बैठकीत उमटले. सार्व. व जि.प. बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या केल्या जाणाऱ्या दुरूस्तीच्या कामांबाबत सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्यांच्या डांबरीकरणाची आणि दुरूस्तीची कामे यापुढे दर्जेदारच झाली पाहिजे अशा सूचना संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तर प्रलंबीत कामे पावसाळयापुर्वी पुर्ण करण्यात यावीत अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी जि. प. बांधकाम विभागाचे प्रभारी श्री. भालेकर यांनी संविधान भवन बांधण्यासाठी दिड कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. तर रस्ते देखभाल दुरूस्तीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध होण्याची आवश्यकता व्यक्त केली.
एकात्मिक बाल विकास योजना विभागाचा श्रीमती लिगम यांनी आढावा घेतला. लेक लाडकी व मातृवंदना योजनाचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या सूचना करण्यात आल्या. पशुवैद्यकीय विभागाच्या आढाव्यात जनावरांना टॅगिंग करण्यात यावे जेणेकरून त्यांची अवैध कारणासाठी होणारी वाहतूक टळू शकेल अशा सूचना करण्यात आल्या. तर तालुक्यात दूध संकलन केंद्राचा आढावा घेवून त्यांच्या उर्जीतावस्थेतसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच यावेळी सांख्यिकी विभाग, ग्रामपंचायत, पंचायत समिती कृषी, उमेद, सामाजिक वनिकरण, खारलॅन्ड व लघूपाटबंधारे व जलसंधारण विभागाचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात काम सुरू असलेल्या धरण प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावेत तसेच शेतकऱ्यांना जमिनींचे मोबदले मिळवून दिले जावेत अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या तर विविध ठराव या बैठकीत पारीत करण्यात आले.
या चर्चेत उपसभापती अभिजीत गुरव, अविनाश पराडकर, भाग्यश्री लाड, प्रसाद मोहरकर, राजेश गुरव, अपेक्षा मासये, गौतम जाधव, समिक्षा वाफेलकर, श्रध्दा गुरव, जान्हवी गावकर यांनी चर्चेत भाग घेतला. आभार उपसभापती गुरव यांनी मानले. लोकप्रतिनिधींनी पहिल्याच सभेत आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला कामाची शिस्त लावण्याच संकेत दिले आहेत.