जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर रत्नागिरीचा वरचष्मा

‘जायंट किलर’ मुरकर आणि कांबळे यांना मोठी संधी
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीचा तिढा अखेर सुटला असून, यामध्ये रत्नागिरी तालुक्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली असून, यामध्ये निवडणुकीत मातब्बरांना धूळ चारणाऱ्या ‘जायंट किलर्स’ना झुकते माप देण्यात आले आहे.

या निवडीमध्ये श्री. विलास चाळके यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली असून त्यांच्याकडे बांधकाम व आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक नियोजनाची महत्त्वाची धुरा ‘जायंट किलर’ ठरलेले श्री. नंदकुमार नारायण मुरकर यांच्याकडे ‘सभापती, अर्थ व शिक्षण’ म्हणून देण्यात आली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सौ. मयुरी मिलिंद शिर्के यांची ‘महिला व बालकल्याण सभापती’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी श्री. महेश राघू नाटेकर यांची ‘औद्योगिक, कृषी व पशुसंवर्धन सभापती’ पदी नियुक्ती झाली आहे, तर अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे यांना समाजकल्याण समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या सर्व नियुक्त्या पुढील सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आल्या आहेत.

या निवडीमध्ये जिल्ह्याचा प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी रत्नागिरी तालुक्याचा दबदबा प्रकर्षाने दिसून आला आहे. रत्नागिरी तालुक्याला दोन सभापती पदे मिळाली आहेत, तर संगमेश्वर, गुहागर आणि चिपळूण या तालुक्यांना प्रत्येकी एक पद देऊन सत्तेचे वाटप करण्यात आले आहे.
विशेषतः निवडणुकीत मोठ्या नेत्यांना पराभूत करून जायंट किलर ठरलेल्या मुरकर आणि कांबळे यांना मिळालेल्या संधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे जिल्ह्याच्या विकासकामांना आता नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.