चिपळूण: कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरून (NH 166E) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. पाटण शहरातील धांडे पुलाचे पुनर्बांधणी आणि बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे पाटण शहरातील रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुढील ६० दिवसांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, हे बदल २७ मार्च २०२६ ते २७ मे २०२६ पर्यंत लागू राहतील.
चिपळूणकर प्रवाशांसाठी नवीन वाहतूक व्यवस्था:
पाटणमधील रस्ता बंद असल्याने चिपळूणकडून सातारा, कराड किंवा पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना खालीलप्रमाणे वळवण्यात आले आहे:
१. अवजड वाहनांसाठी (Truck/Bus):
चिपळूणकडून कराड किंवा उंब्रजकडे जाणारी अवजड वाहतूक आता पाटणमार्गे न जाता संगमेश्वर – आंबा घाट – मलकापूर – कोकरूड – उंडाळे – पाचवड फाटा आणि तिथून राष्ट्रीय महामार्ग ४ वरून पुढे जाईल.
२. हलकी वाहने (Car/Jeep/Bike):
चिपळूणकडून कराडच्या दिशेने जाणारी सर्व हलकी वाहने नेरळे – गौंड – गव्हाणवाडी फाटा – नवारस्ता या मार्गे कराड आणि उंब्रजकडे जातील.
-
कालावधी: २७ मार्च २०२६ (मध्यरात्री ००:०१ पासून) ते २७ मे २०२६ (रात्री २३:५९ पर्यंत).
-
कारण: पाटण शहरातील धांडे पुलाचे काम आणि बाजारपेठेतील रस्ता काँक्रीटीकरण.
-
पोलीस बंदोबस्त: ज्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, त्या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चिपळूणमधील वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.











